

ठाणे: मनोरमा नगर आणि आझाद नगर परिसरातील सुमारे दीडशे एकर जमिनीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरूनच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केला.
त्यांनी माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह शुक्रवारी पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
प्रदीप पूर्णेकर हे कोणत्या पक्षाचे होते, यापेक्षा ते सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बाबी तपास यंत्रणेसमोर मांडल्या आहेत.
या प्रकरणात काही जणांना अटक झाली असून, तपास अधिक खोलवर गेल्यानंतर हत्येमागील नेमके कारण आणि सूत्रधार समोर येतील, असे नाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री या प्रकरणाकडे लक्ष देत असून, खऱ्या गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणून शिक्षा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय मतभेद आणि संघर्ष लोकशाहीच्या चौकटीत असायला हवेत; मात्र तो जीव घेण्यापर्यंत जाऊ नये, असे नाईक यावेळी म्हणाले. या घटनेमागे विविध अँगल तपासले जाण्याची गरज व्यक्त केली.
‘शेवटी सत्य कधी ना कधी उजेडात येते,’ असे सांगत त्यांनी पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली. पूर्णेकर यांच्याशी आपले पूर्वीपासून संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. विकासकामे आणि ड्रग्जशी संबंधित मुद्द्यांचाही तपासात उल्लेख झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पूर्णेकरांच्या घरात महिलेची घुसखोरी
गणेश नाईक पूर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी आले असताना एक अज्ञात महिला घरात शिरल्याची घटना समोर आली. संबंधित महिला घरातील व्यक्तींचे फोटो आणि व्हिडीओ काढत होती, तसेच व्हॉइस कॉलद्वारे कोणाशी तरी संवाद साधत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
घरातील सदस्यांनी तिचे नाव व पत्ता विचारला असता, तिने उलट त्यांच्याकडे ओळख आणि आधारकार्डची मागणी केल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत तिचा मोबाईल फोन जप्त केला. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.