Vikramgad Water Shortage: विक्रमगडमध्ये पाणीटंचाईचे सावट; बंधाऱ्यांची दुरुस्ती करून पाणी अडविण्याची मागणी

कमी पावसामुळे चिंता वाढली; बंधाऱ्यांचे दरवाजे खुले आणि काही ठिकाणी गळती, शेतकरी व ग्रामस्थांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Vikramgad Water Shortage
Vikramgad Water ShortagePudhari
Published on: 
Updated on: 

सचिन भोईर

विक्रमगड: यां वर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने विक्रमगड तालुक्यावर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. पावसाळा संपल्यानंतर नदी-नाल्यांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली असतानाही अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे अद्याप खुलेच असल्याने उपलब्ध पाणीसाठा वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होत असून, संबंधित विभागाने तातडीने बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करून पाणी अडविण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

विक्रमगड तालुक्यात देहर्जे व पिंजाळ या प्रमुख नद्यांसह अनेक मोठे नाले आहेत. या नदी-नाल्यांवर लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून विविध ठिकाणी लहान-मोठे बंधारे उभारण्यात आले आहेत.

पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा पूरस्थिती निर्माण झाल्यास परिसरातील लोकवस्तीला धोका पोहोचू नये, यासाठी बंधाऱ्यांचे दरवाजे खुले केले जातात. पावसाळा संपल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन दरवाजे बंद करत पाणीसाठा अडविणे अपेक्षित असते.

Vikramgad Water Shortage
Vajreshwari Devi Temple: नवसाला पावणारी वज्रेश्वरी देवी! मंदिराचा इतिहास आणि गरम पाण्याच्या कुंडांचे महत्त्व जाणून घ्या

मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी असतानाही अनेक ठिकाणी दरवाजे खुले असल्याचे चित्र असल्याने पाण्याच्या नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील अनेक भागांत पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम शेतीवर झाला आहे.

आता नदी-नाल्यांतील पाण्याची पातळीही कमी होत असल्याने उपलब्ध पाणीसाठा जपणे महत्त्वाचे बनले आहे. अशा परिस्थितीत बंधाऱ्यांमधून पाणी वाहून गेल्यास आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविले गेले नाही, तर नदीकाठच्या विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालावण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने बंधाऱ्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक ठिकाणी दरवाजे बंद करावेत, आणि पाणीसाठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

Vikramgad Water Shortage
Sudhagad Bhorai Devi Temple: सुधागड किल्ल्यावर विराजमान भोराई देवी! जाणून घ्या या ऐतिहासिक दुर्गाचे धार्मिक महत्त्व

देखभाल-दुरुस्तीअभावी पाण्याची गळती

तालुक्यातील विविध नदी-नाल्यांवर कोल्हापूर पद्धतीचे (केटी), सिमेंट आणि दगडी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, काही बंधाऱ्यांचे दरवाजे नादुरुस्त असल्याने पाणी अडविण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी पाण्याची गळती होत असल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

बंधाऱ्यांची नियमित देखभाल आणि आवश्यक दुरुस्ती वेळेत न झाल्यास उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवणे कठीण होणार आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे आवश्यक आहे.

एकीकडे तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी होत असताना, दुसरीकडे उपलब्ध पाणी वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news