

नालासोपारा (ठाणे) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील १२१ किलोमीटरच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होऊनही रस्त्याची अवस्था बिकटच राहिली आहे. ठिकठिकाणी खड्डे, उंचवटे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांनी ठेकेदाराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पालघर जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कामाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले की, यासाठी विशेष एजन्सी नियुक्त करण्यात आली असून खराब पॅनेल काढून नव्या पद्धतीने बसविण्याचे काम सुरू आहे. काँग्रेसचे यांनी या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घोडबंदर ते अचाड या १२५ किलोमीटरच्या पट्ट्यात ६०० कोटी खर्च करूनही रस्त्याची दयनीय अवस्था आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत ३० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे, असा आरोप वर्तक यांनी केला.
२०२३: १८२ गंभीर अपघात - १०६ मृत्यू
२०२४:७४ गंभीर अपघात - ८६ मृत्यू
जुलै २०२५ पर्यंत : ६५ गंभीर अपघात - ७१ मृत्यू
या महामार्गावर ४ सप्टेंबर २०२२ रोजी उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर रस्त्याच्या डिझाइन आणि सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. पुलाचे रेलिंग सुरक्षा कठडे आणि स्ट्रीट लाईटची समस्या या महामार्गावरील अनेक पुलांचे डेक नीचांकी असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वाहन खाली कोसळण्याची शक्यता असल्याने प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत. तसेच महामार्गावरील स्ट्रीट लाईट्स रात्री बंद राहतात, ज्यामुळे वाहनचालकांना अंधारात रस्ता न दिसता अपघात घडण्याची शक्यता वाढते. वसई-विरार युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी प्राधिकरणाला पत्र लिहून पुलाचे संरक्षक कठडे उंचावणे, स्ट्रीट लाईट्स सुरू ठेवणे आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.