Bhiwandi Auto Rickshaw Baby Birth|खड्ड्यांनी कळा वाढवल्या; रुग्णालयाआधीच रिक्षात बाळाचा जन्म!

भिवंडीतील प्रकार, आई-बाळ सुखरूप
Baby Birth
Baby Birth
Published on
Updated on

भिवंडी : भिवंडीतील खड्डेमय रस्त्यांनी आता अक्षरशः माणसांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. रुग्णालयात प्रसूतीसाठी निघालेल्या गर्भवती महिलेच्या वाटेत भिवंडीतील खड्डेच आडवे आले. रस्त्यावरील जीवघेण्या खड्यांमुळे रिक्षाचा वेग मंदावला आणि रुग्णालय गाठण्यापूर्वीच कल्याण नाका परिसरात रिक्षेतच महिलेची प्रसूती झाली.

सुदैवाने आई आणि नवजात बाळ सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेने भिवंडीतील रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. अजमेर नगर परिसरात राहणाऱ्या वर्षा कमलेश यादव यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रिक्षातून भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली.

प्रसूतीची वेळ जवळ आल्याने प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. मात्र, रस्त्यावर पसरलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांनी या प्रवासाला अक्षरशः मरणयातना बनवले. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होणारा प्रवास खड्यांमुळे तब्बल अर्धा ते पाऊण तास लांबला. रिक्षाचा वेग वाढवणे शक्य नसल्याने प्रत्येक खड्डा महिलेच्या वेदना अधिक तीव्र करत होता. अखेर कल्याण नाका परिसरातच वर्षा यादव यांची रिक्षेत प्रसूती झाली आणि त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

यानंतर रिक्षातूनच आई आणि बाळाला तातडीने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई आणि बाळ सुखरूप असल्याने या घटनेत मोठा अनर्थ टळला; पण पुढच्या वेळी सुदैवाची साथ मिळेलच याची काय शाश्वती ? आणखी एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून भिवंडीकरांना खड्यांच्या ससेहोलपटीतून मुक्त करावे, अशी संतप्त मागणी नागरिक आणि नातेवाईकांतून होत आहे.

'खड्डेमुक्त भिवंडी'चा दावा कुठे गेला? रस्त्यांच्या दुरुस्तीच्या घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडत असताना प्रत्यक्ष रस्त्यांवर मात्र खड्यांचे साम्राज्य कायम आहे. गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचवणेही कठीण व्हावे, ही भिवंडीच्या रस्ते व्यवस्थेची गंभीर अवस्था आहे.

Baby Birth
Kalyan-Dombivli Road Potholes | 10 वर्षात 200 कोटी खर्चुनही कल्याण-डोंबिवलीतील रस्ते खड्ड्यात

सुदैवाने आई-बाळ बचावले; पण प्रशासनाचे काय ?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, एखाद्या गंभीर परिस्थितीत रुग्णालयात पोहोचण्यास झालेला हा विलंब जीवावर बेतला असता तर त्याची जबाबदारी कोणाची ? असा संतप्त सवाल आहे.

Baby Birth
Local Train Safety | लोकलमध्ये मृत्यूचा प्रवास थांबवा; मेल, एक्स्प्रेस मुंबई बाहेरून सोडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news