Kalyan-Dombivli Road Potholes | 10 वर्षात 200 कोटी खर्चुनही कल्याण-डोंबिवलीतील रस्ते खड्ड्यात

रस्ते दुरुस्तीचा पैसा वाहून गेला; खड्डे चुकवताना जीव धोक्यात
Kalyan-Dombivli Road Potholes
Kalyan-Dombivli Road Potholes
Published on
Updated on

कल्याण : सतीश तांबे

गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डांबरी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. दरवर्षी रस्ते देखभाल आणि दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पावसाळा आला की रस्त्यांची अवस्था जैसे थेच राहत असल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने अक्षरशः खड्डे चुकवत चालवावी लागत आहेत. त्यातून वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविणे तसेच रस्ते देखभाल-दुरुस्तीसाठी सुमारे २० ते २५ कोटी रुपयांची तरतूद केली जाते.

Kalyan-Dombivli Road Potholes
MMRDA Metro Passengers - एमएमआरडीए मेट्रोतून ३० कोटी प्रवाशांचा प्रवास

मागील दहा वर्षांत पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर सुमारे २०० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा केला जातो. मात्र एवढा मोठा खर्च होऊनही दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची पुन्हा चाळण होत असल्याने करदात्यांचा पैसा नेमका जातो कुठे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची हीच अवस्था होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. कोट्यवर्धीचा खर्च, पुन्हा खड्डे, पुन्हा डागडुजी आणि पुन्हा खर्च या दुष्टचक्रातून केडीएमसी कधी बाहेर पडणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

खड्डे बुजविण्याऐवजी खडी पसरविण्याचा 'उपचार'

महापालिका प्रशासनाकडून खड्ड्यांमध्ये खडी टाकून ते बुजविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र वाहनांची सतत ये-जा होत असल्याने ही खड़ी पुन्हा बाहेर पडते आणि खड़े आणखी मोठे होतात. रस्त्यावर पसरलेली खडी वाहनांच्या चाकांखाली उडून पादचाऱ्यांना दुखापत होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे

Kalyan-Dombivli Road Potholes
Mumbai Police Salary Scam - मुंबई पोलिसांच्या वेतन घोटाळ्यात डिजिटल पुराव्यांचा शोध

शहरभर खड्ड्यांचे जाळे

कल्याण पश्चिमेकडील अहिल्याबाई चौक, पारनाका, टिळक चौक, दूधनाका, आधारवाडी, उंबर्डे, आंबिवली, बल्याणी, कल्याण पूर्वेकडील ३० गावे, चक्कीनाका, खड़ेगोलवली, श्रीराम टॉकीज चौक तसेच डोंबिवली पूर्व-पश्चिम आणि २७ गावांतील ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांची अक्षरशः कसरत होत आहे.

४५ कोटींचा रस्ताही खड्ड्यात

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका ते मलंग रोड या मार्गाच्या डांबरीकरणासाठी काही वर्षांपूर्वी तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच या रस्त्यावर मोठमोठे खड़े पडल्याने त्याची अवस्था दयनीय झाली आहे. आता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र नवीन रस्ता होईपर्यंत नागरिकांनी काय करायचे. असा सवाल उपस्थित होत आहे.

नाटकाच्या कलाकारांनाही खड्ड्यांचा फटका

रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा फटका आता सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बसू लागला आहे. रविवारी, २ ऑगस्ट रोजी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी चार वाजता प्रसिद्ध 'ऑल द बेस्ट' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र नाट्यकलावंतांना नाट्यगृहात पोहोचण्यास अर्ध्या तासापेक्षा अधिक विलंब झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news