

पनवेल (ठाणे): भाजप शिवसेनेमधील जागावाटपाच्या चर्चेला अंतीम स्वरूप येत नसल्याने पनवेल नवी मुंबईत भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. तर ठाणे कल्याण डोंबिवलीत महायुती करण्यावर एकमत झाले आहे.
दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने ठाकरे बंधूंच्या प्रभाव क्षेत्रात महायुती करायची, पण भाजपचे एकतर्फी वर्चस्व असलेल्या पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर या महानगरपालिका स्वतंत्र लढण्यावर भाजपने विचार सुरू केला आहे. दरम्यान पनवेलमध्ये शिवसेनेने १० जागा मागितल्या आहेत. तर भाजपने ३ जागा देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र सन्मानजनक जागा मिळेपर्यंत शिवसेना भाजपबरोबर जाण्यास तयार नसल्याने चर्चेचा गुऱ्हाळ सुरूच आहे.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापू लागले असले, तरी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याबाबत पक्षांमध्ये अद्यापही संभ्रमाचे चित्र दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांत पालिका हद्दीतून तब्बल ८५० हून अधिक उमेदवारी अर्ज व नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असली, तरी एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने राजकीय गणिते शेवटच्या टप्प्यात अडकल्याचे स्पष्ट होत आहे. उमेदवार निवडीबाबत पनवेलमध्ये महायुतीत चर्चेची गुऱ्हाळे सुरुच असून, उमेदवारांच्या निवडीबाबत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिंदे शिवसेना यांच्यात खलबते सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. २०१७ च्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत ५१ नगरसेवक निवडून आणले होते. त्यावेळ विरोधी बाकावर असलेल्या शेकाप आणि महाविकास आघाडीतील पक्षांचे मिळून २० हून अधिक नगरसेवक निवडून आले होते. यंदाह भाजप मुसंडी मारेल, अशी चर्चा सुरुवातीपासून सुरू आहे. मात्र, निवडणूक जाहीर होऊन दिवस उलटत असतानाही भाजपकडून एकह अधिकृत उमेदवारी यादी जाहीर न झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महायुतीच्या आघाडीवरही चित्र स्पष् नाही. भाजप आणि शिंदे गटाची शिवसेन यांच्यात युती होईल, या आशेवर दोन्ह पक्षांतील इच्छुक उमेदवार सध्या वाट पाहत आहेत. महायुतीची अधिकृत घोषणा न झाल्याने अनेक प्रभागांत इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठ आता केवळ दोन दिवसांचा कालावध शिल्लक राहिल्याने शेवटच्या क्षणी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
मविआतही संभ्रमावस्था
दुसरीकडे महाविकास आघाडीबाबतही गोंधळ कायम आहे. आघाडी 'जुळली आहे' असे सांगितले जात असले, तरी अधिकृत घोषणा आणि उमेदवारांची यादी अद्याप समोर आलेली नाही. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष एका मंचावर येऊन महायुतीला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र जागावाटप आणि स्थानिक समीकरणांमुळे अंतिम निर्णय रखडल्याचे चित्र आहे.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत आम्हाला भाजपाकडून सन्मानजनक जागा हव्या आहेत. भाजपाने देवू केलेल्या जागा या फार अत्यल्प होत्या. त्यामुळे त्या आम्ही स्विकारल्या नाहीत. आता भाजपाकडून सन्मानजनक प्रतिसाद येत असल्याने आम्ही आशावादी आहोत. पनवेल मध्ये महायुतीच निवडणूक लढेल असा विश्वास आहे. भरतशेठ गोगावले, मंत्री