

पनवेल ः विक्रम बाबर
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अधिकृतपणे वाजले असून, उमेदवारी प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. 23 डिसेंबरपासून महापालिका हद्दीत नामनिर्देश पत्रांची विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पहिल्याच दोन दिवसांत इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. केवळ दोन दिवसांत तब्बल 432 नामनिर्देश पत्रांची विक्री झाल्याने निवडणुकीतील स्पर्धा तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
एकूण 78 जागांसाठी ही प्रक्रिया सुरू असून, पहिल्याच दिवशी 234 नामनिर्देश पत्रांची विक्री झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी 198 अर्जांची विक्री नोंदविण्यात आली. सलग दोन दिवसांत मोठ्या संख्येने अर्ज विकले गेल्याने राजकीय वातावरण तापू लागले असून, विविध पक्षांसह अपक्ष इच्छुकांनीही मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
प्रत्येक केंद्रावर आवश्यक कर्मचारी, मार्गदर्शन व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून, उमेदवारांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. पहिल्या दोन दिवसांतच उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी या केंद्रांवर पाहायला मिळाली. नामनिर्देश पत्रांच्या विक्रीतील हा उत्साह पाहता, येत्या काही दिवसांत अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक ही स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
सहा ठिकाणी केंद्राची उभारणी
नामनिर्देश पत्रांची विक्री व स्वीकारणी सुलभ व्हावी, तसेच गर्दीचे योग्य नियोजन करता यावे यासाठी पनवेल महानगरपालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. महापालिका हद्दीतील एकूण 20 प्रभागांसाठी जवळपास सहा ठिकाणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. नावडे प्रभाग कार्यालयासह खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल-1 आणि पनवेल-2 या ठिकाणी नामनिर्देश पत्र विक्री व स्वीकारणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.