

ठाणे : रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांनी आरसीबी आणि इंडियन ऑक्सिड्स ॲन्ड केमिकल यांच्या सहकार्याने, तसेच चिराग रुरल डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील कासघर (सपने ग्रामपंचायत) आणि सावरखंड (चिखले ग्रामपंचायत) या दोन गावांमध्ये सौर ऊर्जेच्या आधारे ग्रामीण परिवर्तन घडवून आणले आहे.
कासघरमध्ये शाश्वत शेतीला चालना याबाबत शेरनाझ वकील, माजी अध्यक्ष, यांनी सांगितले की कासघर हे 32 शेतकरी कुटुंबांचे (151 लोकसंख्या) गाव असून येथे 5 क्षमतेच्या सौर पंप आणि 1500 मीटर पाइपलाइनच्या साहाय्याने वर्षभर सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे सध्या फक्त पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या 38.5 एकर शेतीऐवजी 68 एकर क्षेत्रावर वर्षभर शेती करता येणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी अतिरिक्त पाइपलाइन देण्यात आल्या असून कृषी विज्ञान केंद्र यांच्या तज्ज्ञांकडून शाश्वत शेतीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी जलव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक शेतकऱ्याला 15 आंबा आणि 5 काजू रोपे देण्यात येणार असून यामुळे दीर्घकालीन उत्पन्नास चालना मिळेल आणि सुमारे 2.4 एकर क्षेत्रावर कृषी-वनीकरण होईल.पुलीन श्रॉफ यांनी सांगितले की गावातील सर्व घरांना सौर दिवे आणि पाण्याचे फिल्टर देण्यात आले आहेत. तसेच 8 सौर रस्ते दिव्यांमुळे गावातील रस्ते अधिक सुरक्षित आणि प्रकाशमान झाले आहेत.
प्रतिभा पै यांनी सांगितले की, सावरखंडमधील धोडेपाडा, माघापाडा, माथापाडा आणि पाटीलपाडा या चार पाड्यांमध्ये 5 सौर पंपाच्या माध्यमातून घरगुती पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे. या पंपाद्वारे पाणी 6 साठवण टाक्यांमध्ये साठवून विविध ठिकाणी नळाद्वारे उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे महिलांना कठीण भूप्रदेशातून पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागत नाही. तसेच सर्व कुटुंबांना सौर दिवे आणि पाण्याचे फिल्टर देण्यात आले असून 15 सौर रस्ते दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी सुरक्षितता आणि वावर सुलभ झाला आहे.