

सापाड : कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी परिसरात भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मुख्य रस्ते अडवून व्यापाऱ्यांनी मांडलेल्या दुकानांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या ठिकाणी पोलीस व महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
रौनक सिटी परिसर हा नव्याने विकसित होत असलेला भाग असून, येथे उंच इमारती, निवासी संकुले आणि वाढती लोकसंख्या यामुळे दैनंदिन वाहतुकीचा ताण आधीच मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत मुख्य रस्त्यावरच आठवडाबाजार भरविण्यात येत असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः बाजाराच्या दिवशी रस्त्यांवर पायी चालणे देखील कठीण होऊन बसते.
या परिसरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी दुकानांचा पसारा मांडलेला असतो. अनेक ठिकाणी माल रस्त्यावरच पसरवला जातो, त्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अधिकच कमी रुंदीचे होतात. दोन्ही बाजूंनी सुमारे 20 फूट रुंदीचे रस्ते असले तरी अतिक्रमणामुळे ते प्रत्यक्षात खूपच अरुंद झाले आहेत. यामुळे वाहनांची ये-जा संथ गतीने होते आणि अनेकदा तासन्तास वाहतूक कोंडी निर्माण होते. जड वाहने, खासगी गाड्या, रिक्षा आणि दुचाकी यांचा एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर ताण येत असल्याने परिस्थिती अधिक बिकट होते.
शहरासह ग्रामीण भागातून येणारी वाहनेही या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे कोंडीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे. आठवडा बाजाराच्या दिवशी घराबाहेर पडणे ही एक मोठी कसरत ठरते. महिलांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याने चालताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. गर्दीतून वाट काढताना अनेकदा धक्काबुक्की होते, तसेच अपघाताचा धोका कायम असतो. विशेष म्हणजे या आठवडी बाजारामुळे आपत्कालीन सेवांनाही या कोंडीचा फटका बसत आहे. ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दलाची वाहने आणि स्कूल बसेस यांना या मार्गावरून मार्ग काढणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे एखादी गंभीर घटना घडल्यास त्याचे परिणाम अधिक घातक ठरू शकतात. समाजसेविका रुपिंदर सिंग कौर यांनी सांगितले की, आठवडा बाजारामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या ॲम्ब्युलन्समधील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महासभेत अनेकवेळा हा मुद्दा उपस्थित करूनही याबाबत कोणतेही नियोजन होताना दिसून आले नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजी वाढत आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा निश्चित करून द्यावी, मुख्य रस्त्यांवर बाजार भरविण्यास बंदी घालावी, बाजाराच्या दिवशी वाहतूक पोलिसांची पूर्ण वेळ नियुक्ती करावी, अतिक्रमणावर कठोर कारवाई करावी, आपत्कालीन वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग राखून ठेवावा, अशा मागण्या सध्या स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागल्या आहेत. वाढती लोकसंख्या, अपुरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा विचार करून प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
आम्ही या परिसरात अनेक वर्षांपासून राहतो. आठवडी बाजाराच्या दिवशी रस्त्यावर चालणे देखील अवघड होते. व्यापारी रस्त्यावरच बसतात आणि नागरिकांसाठी जागाच राहत नाही. आठवडी बाजारात व्यापारी रस्ते गिळंकृत करून वाहतूककोंडी निर्माण होत आहे. विशेष म्हणजे आठवडे बाजारातून मोठा आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे आठवडे बाजार महासभेत गाजून देखील ते बंद होत नाहीत.
डॉ. रूपिंदर सिंग-कौर, समाजसेविका