

ठाणे : सक्तवसुली संचालनालयाने आयएसआयएस संबंधित मॉड्यूलच्या आर्थिक पराठीराख्यांचा बोरिवलीच्या पडघामध्ये पर्दाफाश केला आहे. देशव्यापी कारवाईत ईडीने आज (13 डिसेंबर) सात राज्यांमधील 40 ठिकाणी छापे टाकले. यात महाराष्ट्रातील बोरिवली पडघा, दिल्ली, कोलकाता, हजारीबाग, प्रयागराज, दमण आणि रत्नागिरी यांचा समावेश आहे. या कारवाईत 3.7 कोटी रुपयांची रोकड आणि 6 कोटी रुपयांचे सोने अशी एकूण 9.7 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे एका अत्याधुनिक, स्वयंपूर्ण दहशतवादी प्रणालीचे जाळे उघड झाले आहे.
ही चौकशी घटना-आधारित दहशतवादी तपासापासून दूर जाऊन कट्टरपंथी नेटवर्कला आधार देणारी संपूर्ण प्रणाली नष्ट करण्याच्या दिशेने एक निर्णायक बदल दर्शवते. या तपासातून हे स्पष्ट होते की, बोरिवलीच्या पडघामधील मॉड्यूल कोणताही कट्टरपंथी गट नव्हता, तर दीर्घकालीन नियोजनासह एक आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण जिहादी युनिट होते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण साकिब नाचन या आयएसआयएस-संबंधित प्रमुख सूत्रधाराभोवती फिरते, ज्याचे नेटवर्क, तपासकर्त्यांनुसार, ऑनलाइन प्रचार आणि वैचारिक प्रबोधनाच्या पलीकडे गेले होते. मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करणे, 25 बँक खाती गोठवणे आणि स्थावर मालमत्ता ओळखणे हे पद्धतशीर आर्थिक नियोजनाचे संकेत देतात, जे तुरळक किंवा एकट्या व्यक्तीच्या हल्ल्यांऐवजी मोठ्या आणि अधिक संघटित दहशतवादी हल्ल्यांच्या तयारीकडे निर्देश करतात. तसेच तपासकर्त्यांचा विश्वास आहे की, या मॉड्यूलने विचारधारा, भरती, प्रशिक्षण, लॉजिस्टिक्स आणि विविध महसूल स्रोतांना एकत्र आणले होते, जे जागतिक आयएसआयएस गटांप्रमाणेच एक संघटित कार्यप्रणाली दर्शवते.
दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याच्या संशयावरून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया मॉड्यूल आणि पुणे कनेक्शन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी देशभर मोठी कारवाई करत एकाच वेळी 40 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. महाराष्ट्रासह दिल्ली, कोलकाता आणि उत्तर प्रदेशात ही धडक मोहीम राबवण्यात आली असून राज्यातील पडघा-बोरिवली परिसर, दमण तसेच रत्नागिरी जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. रत्नागिरीत ईडीची छापेमारी झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ईडीने दहशतवादी निधी उभारणीच्या संशयावरून ठाणे जिल्ह्यातील पडघा, भिवंडीजवळील बोरिवली, दमण, पुणे, मालेगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एका उद्योजकाच्या कात कारखान्यावर धाड टाकली. दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील संबंधित उद्योजकाच्या घरात ईडीचे अधिकारी ठाण मांडून तपास करत आहेत. खैर वृक्षाच्या तस्करीतून मिळालेला पैसा दहशतवादी कृत्यांसाठी वापरला जात असल्याचा संशय व्यक्त करत ही कारवाई आयकर विभाग आणि महाराष्ट्र एटीएसच्या सहकार्याने करण्यात आली आहे. ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी परिसरातील पडघा येथे गुरुवारी पहाटेपासून तपास सुरू असून एनआयए आणि एटीएसशी संबंधित प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात 40 ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
पडघा येथील बोरिवली गावात यापूर्वी झालेल्या कारवाईच्या धाग्यांवरून ही मोहीम राबवण्यात आली असून संशयितांच्या घरांची झडती सुरू आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा तपास केला जात असून राष्ट्रीय तपास यंत्रणाही या तपासात ईडीला सहकार्य करत आहे. दरम्यान, पडघा-बोरिवलीसह दिल्ली, कोलकाता, हजारीबाग, प्रयागराज, दमन आणि रत्नागिरी येथील छापेमारीत सुमारे साडेनऊ कोटी मालमत्ता जप्त केली. शिवाय आरोपी, संशयितांची 25 बँक खाती गोठवली असून विविध आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल उपकरणे तसेच स्थावर मालमत्तांसंबंधित कागदपत्रेही ईडीच्या ताब्यात घेण्यात आली आहेत. चिपळूण तालुक्यातील संबंधित उद्योजकाच्या कात कारखान्यावरही ईडीने छापा टाकत तपास सुरू केला आहे. यापूर्वी चेकद्वारे झालेल्या व्यवहारांप्रकरणी या उद्योजकाची एटीएसकडून चौकशी झाली होती. आता पुन्हा एकदा त्याच उद्योजकावर ईडीची कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावेळी ईडीचे अधिकारी थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत.