

जळगाव: शहरात गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या घरफोडीच्या घटनांची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय घरफोडी टोळीच्या मुख्य आरोपीला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. या आरोपीने जळगाव शहरातील चार घरफोड्यांची कबुली दिली आहे.
वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रमेश भुरूसिंग अनारे (वय २७, रा. स्कुल फळिया, गुडा, ता. कुक्षी, जि. धार, मध्यप्रदेश) या अट्टल गुन्हेगारास निष्पन्न करून ताब्यात घेण्यात आले.
आरोपी रमेश अनारे याने जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्यासोबत गुन्हे करणाऱ्या पाच साथीदारांची नावेही त्याने पोलिसांना सांगितली आहेत. हे सर्व आरोपी मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामध्ये कुंद्या डावरीया (रा. पडौटा मोरसिंगे), बरदान देवका (रा. गोराडीया), कालु डावरीया (रा. नरवारी), राहुल डावरीया (रा. भडकच्छ, ता. कुक्षी) आणि सुनिल परमाती (रा. गेटा बाग तांडा, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अतुल वंजारी, पोहवा विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, चापोशि महेश सोमवंशी व बाबासाहेब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
मुख्य आरोपी रमेश अनारे यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पुढील तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडली.