

ठाणे : रस्ते अपघातात गंभीर जखमी होऊन ब्रेन डेड झालेल्या 33 वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे तब्बल 9 जणांना नवजीवन मिळाले. दु:खाच्या प्रसंगीही कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मानवतेचा आदर्श पुढे आला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये पार पडली.
29 मार्च रोजी झालेल्या रस्ते अपघातात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला महावीर जैन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याची प्रकृती खालावत गेली आणि डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. यानंतर कुटुंबीयांना परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली. दु:खावर मात करत त्यांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेत संमती दर्शवली.
यानंतर डॉक्टरांच्या टीमने तातडीने अवयवदानाची प्रक्रिया सुरू केली. हृदय, दोन किडनी, लिव्हर, पॅन्क्रियाज, कॉर्निया आणि हाडांचे ऊतक असे विविध अवयव संकलित करण्यात आले. विशेष म्हणजे लिव्हरचे दोन भाग करून (स्प्लिट लिव्हर) वेगवेगळ्या रुग्णांना प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून हे अवयव मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये पोहोचवण्यात आले आणि 9 रुग्णांवर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यामध्ये 9 वर्षांच्या बालकावर लिव्हर प्रत्यारोपण यशस्वी झाले, ही विशेष बाब ठरली.
ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे 40 डॉक्टरांच्या टीमने समन्वयाने पार पाडली. ब्रेन डेड घोषित करण्याची प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर असून शासनाच्या नियमांनुसार सर्व तपासण्या आणि नातेवाईकांची संमती घेतल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान, अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करताना तज्ज्ञांनी सांगितले की, किडनी, लिव्हर आणि इतर अवयवांसाठी हजारो रुग्ण प्रतीक्षेत आहेत. वेळेवर अवयव मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे समाजाने अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.
अवयवदान ही जीवन वाचवणारी चळवळ आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते. देशात हजारो रुग्ण किडनी, लिव्हर, हृदय यांसारख्या अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी कुटुंबीयांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरतो.