Diwali faral boxes for soldiers : सैनिक हो तुमच्यासाठी...फराळाचे दहा हजार बॉक्स सीमांवरील जवानांपर्यंत
डोंबिवली : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कार्यरत असलेल्या १० सीमांवरील सैनिकांना १० हजार दिवाळी फराळाचे बॉक्स पोहोचविण्यात आले आहेत. भारत विकास परिषदेच्या डोंबिवलीतील हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सच्चान शाखेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ५०० रूपये प्रती बॉक्सप्रमाणे ५० लाखांचे उद्दिष्ट अंतिम टप्प्यात असून ते दिवाळीपर्यंत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने नक्की पूर्ण होईल, याची खात्री शाखा अध्यक्षा अॅड. वृंदा कुळकर्णी यांनी व्यक्त केली.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून फराळाच्या बॉक्स पॅकींगचे सुरू झालेले काम दसऱ्याच्या दिवशी संपले. हे बॉक्स गंतव्यस्थानी पोहोचल्याचा पहिला प्रफुल्लित करणारा निरोप ९ ऑक्टोबर आला. दीपावली उत्सव साजरा करण्यापूर्वी साधारणतः ९० टक्के जागी फराळाचे बॉक्स सर्व सीमेवरील सैनिकांच्या हातात पोहोचतील, ही उत्साहवर्धक बाब असल्याचे अॅड. वृंदा कुळकर्णी यांनी सांगितले. यंदा पहिल्यांदाच काही महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि राष्ट्रप्रेमी नागरिक अशा १६ हून अधिक गटांचा सहभाग हा मोठा जनाधार ठरला.
फराळाच्या प्रत्येक बॉक्ससोबत शाळेतील विद्यार्थी,कलाकार आणि चित्रकारांनी स्वयंप्रेरणेने तयार केलेले खास शुभेच्छापत्र आम्हालाच नव्हे तर सैनिकांना देखील आनंद देणारे ठरले. त्याचबरोबर आमचे ३ सदस्य आणि २४ राष्ट्रभक्त कवी लिखित ऑपरेशन सिंदूर वरील सुंदर कविता देखील प्रेरणादायी व सैनिकांना मानवंदना देणाऱ्या ठरल्या. जवळपास २ हजारांहून अधिक वैयक्तिक देणगीदार, आमचे सदस्य, संस्था, स्वयंसेवी संस्था, बँकांतून ३५ लाख रूपयांपेक्षा जास्त रकमेचे योगदान, सैनिकांप्रती असलेले प्रेम, आदर आणि कृतज्ञता दर्शविणारे आहे.
या प्रकल्पाचे हे सलग तिसरे वर्ष
हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सच्चानच्या डोंबिवली शाखेने हाती घेतलेल्या या प्रकल्पाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्ष्य दुप्पट करून १० हजार सैनिकांपर्यंत पोहोचविण्याचा आणखी एक टप्पा गाठला आहे. हे सर्व केवळ समाजातील राष्ट्रप्रेमी नागरिक, भारत विकास परिषदेचे प्रांत तथा विभाग अधिकारी आणि प्रसिद्धी माध्यमांमुळेच शक्य झाल्याचे अॅड. वृंदा कुळकर्णी यांनी सांगितले.
डोंबिवली शाखेचे काही सदस्य स्वहस्ते फराळ वाटपासाठी प्रत्यक्ष काही सीमांवर भेट देऊन सैनिकांचे अभिनंदन करून आभार प्रकट करतीलच, शिवाय काही सैनिकांनी दूरध्वनीद्वारे आम्हास संपर्क केला व काही धन्यवादाचे संदेश पाठविले असले तरी आम्ही सैनिकांचे खरे ऋणी आहोत, असेही अॅड. वृंदा कुळकर्णी म्हणाल्या.
