

बदलापूर, पुढारी वृत्तसेवा : बदलापूर येथे रेल्वे स्थानकावर आज (दि.५) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. एका तरुणाने दोघांवर गोळीबार केल्याने तणावपूर्ण वातावरण झाले होते. यात एक जण जखमी झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरूवात केली. गोळीबार करणाऱ्या विकास नाना पगारे (वय २५) याला अटक करण्यात आली आहे. केबल वारमधून पैशांच्या वादातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मवर गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहा वाजता शंकर संसारे याच्यावर विकास पगारे याने गोळीबार केला. यात शंकर संसारे हा जखमी झाला आहे.
बदलापूर पश्चिमेकडील वैशाली टॉकीज समोर या दोघांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर शंकर संसारे याला तीन ते चार जणांनी मारहाण केली. त्यामुळे शंकर हा बदलापूर रेल्वे स्थानकावर आला. त्यानंतर विकास पगारे याने त्याच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी आरोपी विकास पगारेला ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समजते. पुढील तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत. यातील काही आरोपी हे तडीपारही असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.