

राजेश जागरे
शहापूर: एकेकाळी गावाच्या जीवनवाहिनी ठरलेल्या आणि पिढ्यान्पिढ्यांची तहान भागविणाऱ्या जुन्या विहिरी आज आधुनिक पाणीपुरवठा योजनांच्या काळात दुर्लक्षित होत आहेत. नळपाणी आणि बोअरवेलच्या सुविधांमुळे या पारंपरिक जलस्रोतांकडे पाठ फिरवली जात असून अनेक विहिरींची अवस्था कचरा- कुंडीसारखी झाली आहे.
एल निनोच्या संभाव्य संकटामुळे भविष्यात पाणीटंचाईची भीती व्यक्त होत असताना, पूर्वजांनी निर्माण केलेल्या या जलसंपत्तीचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
शासन कोट्यवधी रुपये खर्चून जलसंधारणाचा आराखडा तयार करत असताना गावातील अस्तित्वात असलेल्या जुन्या विहिरी व तलाव आणि पारंपरिक जलस्रोतांचे जतन करणेही तितकेच आवश्यक आहे. गावातील जुन्या विहिरी म्हणजे केवळ पाण्याचे स्रोत नसून त्या गावाच्या इतिहासाच्या, संस्कृतीच्या आणि अनेक पिढ्यांच्या आठवणींच्या साक्षीदार आहेत.
मात्र आधुनिकतेच्या प्रवाहात नळपाणी आणि बोअरवेलच्या सुविधांमुळे अशा पारंपरिक जलस्रोतांकडे दुर्लक्ष होत असून अनेक ठिकाणी त्यांची अवस्था कचराकुंडीसारखी झाली आहे. गावच्या विहिरींची अवस्था पाहून त्यांच्या संवर्धनाचा भावनिक संदेश देणे आज गरजेचे झाले आहे.
अनेक पिढ्यांपासून गावात अस्तित्वात असलेल्या या विहिरीने कित्येक पिढ्यांची तहान भागवली आहे. नळ आणि बोअरवेलची सुविधा नसतांना पहाटे पाणी भरण्यासाठी होणारी लगबग, शाळा सुटल्यानंतर मुलांचा गोंधळ, शेतातून परतलेल्या बैलांची तहान भागवणारे पाणी तसेच विहिरीवर रंगणाऱ्या सुख-दुःखाच्या गप्पा, या सगळ्यांच्या आठवणी या विहिरीशी जोडलेल्या आहेत.
एकेकाळी गावाच्या सामाजिक जीवनाचे केंद्र असलेली ही विहीर आज मात्र दुर्लक्षित झाली आहे. ज्या विहिरीने आपल्याला आयुष्यभर पाणी दिले, त्याच विहिरीला आपण कचराकुंडी बनवले ही अत्यंत खेदाची बाब आहे.
विहिरीचे पाणी आटले नाही, तर माणसातील माणुसकी आणि कृतज्ञताच आटली आहे. अशी खंत व्यक्त होत आहे. विहिरीचे पाणी म्हणजे अमृत असून या पारंपरिक जलस्रोतांचे जतन करणे ही प्रत्येक गावकऱ्याची सामूहिक जबाबदारी आहे. विहीर वाचली तर पाणी वाचेल आणि पाणी वाचले तरच गावाचे अस्तित्व टिकेल याची जाणीव प्रत्येक नागरिकाला होणे क्रमप्राप्त आहे.
गावच्या विहिरिंना मोठा इतिहास आहे. त्यांनी कित्येक पिढ्यांना पाणी दिले. अनेकांच्या सुख-दुःखाच्या क्षणांची साक्षीदार आहेत. पूर्वी गावाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली ही विहीर आज दुर्लक्षित होऊन कचऱ्याचे ठिकाण बनत असल्याचे पाहून मनाला वेदना होतात. विहीर ही आपल्या पूर्वजांनी जपलेली अनमोल ठेव आहे. तिची स्वच्छता, दुरुस्ती आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. कारण विहीर म्हणजे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर ती आपल्या गावाच्या इतिहासाची आणि संस्कृतीची जिवंत साक्षीदार आहे.
- हरिश्चंद्र कृष्णा हरड (पर्यावरण प्रेमी)