

जोगेश्वरी: जोगेश्वरी पूर्व मेघवाडी परिसरातील गजानन निवास वेलफेअर सोसायटीमधील रहिवाशी गेले काही दिवस काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहेत. रात्रीच्या वेळी नळाला काळकुट्ट पाणी येत असून त्याला उग्र दुर्गंधी येत आहे. जलवाहिनीत सांडपाणी (गटाराचे पाणी) मिसळत असल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सोसायटीतील रहिवाशांच्या दाव्यानुसार, दिवसा पाण्याचा पुरवठा होताना तुलनेने पाणी स्वच्छ दिसते. मात्र, रात्रीच्या वेळी जेव्हा मुख्य जलवाहिनीतील पाण्याचा दाब कमी होतो, तेव्हा नळावाटे येणाऱ्या पाण्यात बदल जाणवतो. नळ सुरू केल्यानंतर सुरुवातीला येणारे पाणी दुर्गंधीयुक्त आणि काळपट रंगाचे असते.
तांत्रिक बिघाडामुळे जमिनीखालील सांडपाण्याची वाहिनी आणि पिण्याच्या पाण्याची वाहिनी यांच्यात क्रॉस कंटॅमिनेशन (पाणी मिसळणे) होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जुन्या झालेल्या आणि गंजलेल्या पाईपलाईन्समुळे हा प्रकार घडत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. तांत्रिक भाषेत ज्याला बॅक सायफोनेज म्हटले जाते. त्या प्रक्रियेमुळे कमी दाबाच्या स्थितीत बाहेरील दूषित पाणी पिण्याच्या वाहिनीत ओढले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच रात्रीच्या वेळी नळावाटे विषारी पाणी येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.