

नेवाळी : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. डोंबिवलीच्या पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात नामांतर विषयक जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनाची पहिली डोंबिवली विभागाची बैठक पार पडली आहे. नियोजनाच्या पहिल्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आगामी आंदोलनाची ठाम दिशा निश्चित केली आहे. नुसत्या घोषणा नव्हे तर ठोस कृतीचा निर्धार या बैठकीतून अधोरेखित झाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन-अडीच महिन्यांत नवी मुंबई विमानतळाला ‘लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हे नाव देण्याचे आश्वासन भूमिपुत्रांना दिले होते. परंतु ते प्रत्यक्षात उतरतानाचे कोणतेही संकेत दिसत नसल्याने भूमिपुत्रांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली आहे. “नाव म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर अस्मिता, हक्क आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे,” असा ठाम स्वर बैठकीतून उमटला आहे.
या पार्श्वभूमीवर 22 ते 25 डिसेंबरदरम्यान, तर आवश्यकता भासल्यास पुढेही, भिवंडी येथून विमानतळापर्यंत पायी जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. मोर्चा अत्यंत शिस्तीत, शांततेत आणि संघटित पद्धतीने निघेल यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. “आम्ही कुठला कचरा न करता, एका मागोमाग एक, हक्कासाठी लांब रांग निर्माण करून आपली एकता दाखवू,” अशी भूमिका भूमिपुत्रांनी बैठकीत व्यक्त केली आहे.
हरिनाम सप्ताहात देखील जनजागृती करण्यास सुरुवात
डोंबिवलीत झालेल्या नियोजनाच्या पहिल्या बैठीकीनंतर दिवा विभागातील आगासन गावात पूर्वतयारीची बैठक पार पडली आहे. गावात गावात संपर्क मोहिम सुरू असून आगामी मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. समाजाची एकजूट आणि ऐक्य हेच शक्तिशाली अस्त्र असल्याचे मत नेत्यांनी व्यक्त केले आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी भूमिपुत्रांकडून कंबर कसली जात आहे.
यासाठी गावागावात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहात देखील जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक प्रशासनापासून केंद्र शासनाचे लक्ष वेधणारे हे भूमिपुत्रांचे आंदोलन असणार आहे. नामांतराच्या प्रश्नावर भूमिपुत्रांचा रोष आणि निर्धार दोन्हीही प्रकर्षाने दिसून येत आहे. मुख्यमंत्री दिलेला शब्द पूर्ण करेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असून यासाठी व्यापक सामाजिक एकजुटीची सांगड घालून मोर्चाच्या तयारीला वेग आला आहे.