

भिवंडी : भिवंडीत अमली पदार्थ, गुटखा विक्री सर्रासपणे सुरू असून या बाबत अनेक तक्रारी वादात असतानाच नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार रईस शेख यांनी भिवंडी शहर गुटखा तस्करीचे हब बनत असल्याचा आरोप करीत शासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. मंगळवारी विधानसभेत भिवंडी शहरातील गुटखा तस्करीचा मुद्दा उपस्थित केला.
यावेळी भिवंडी हे गुटखा वाहतूक तस्करीचे हब बनत असून गुजरात येथून येणारा गुटखा वितरण भिवंडी येथून होत आहे. भिवंडीत गोदाम व्यवसाय फोफावला असून त्या पूरक वाहतूक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्या आडून गुटखा तस्करी करून भिवंडीत वितरणासाठी आणला जातो. त्यासाठी या वाहतूक व्यवस्थेला उध्वस्त करण्याची गरज आहे. भिवंडीत पोगाव येथे गुटखा फॅक्टरी मिळाली पण गुन्हेगार जामीना वर सुटले आहेत.
मागील आठवड्यात भिवंडी शहर व ग्रामीण भागात विकास सर्रासपणे विक्री होत असताना भिवंडी गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या केलेल्या कारवाईमध्ये शांतीनगर परिसरातील तब्बल साडे सोळा लाखांचा गुटखा जप्त केला असून एक जणास ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात नागाव परिसरातील मकसद भाईची दुमजली बिल्डींग मधील तळमजल्या गाळ्यात आबदान मोहम्मद अन्सारी याने प्रतिबंधित 8 लाख 76 हजार 540 रुपये किमतीचा गुटखा संगधित पान मसाला, सुंगधित तंबाखु साठवणूक केलेली आढळून आली.
आणखी एका कारवाईत गुजरात येथून भिवंडी मार्गे मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक करून आणून विक्रीसाठी वितरीत करण्यात आणला जातो. अशाच पद्धतीने टाकी केल्या जाणाऱ्या गुटख्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करीत 21 लाख 15 हजार 250 रुपयांचा बनारसी आशिक सुगंधी सुपारी व बनारसी आशिक सुगंधी तंबाखू हा साठा जप्त करीत 10 लाख रुपये किमतीचा टाटा टेम्पो क्रमांक एम एच 48 सी बी 4325 हा ताब्यात घेतला आहे.
गुटखा बंदीसाठी कायदा अधिक कडक करा
भिवंडीतील गुटखा माफियांचा तस्करी मोडून काढण्यासाठी राज्य शासनाने एक टाक्स फोर्स बनविण्याची मागणी आमदार रईस शेख यांनी सभागृहात केली आहे. गुटखा माफियांवर कारवाई करणारे कायदे कमकुवत असल्याने त्यांना लगेच जामीन मंजूर होतो. त्यामुळे गुटखा बंदी कठोर करण्यासाठी गुटखा माफियां विरोधातील कायदा अधिक कडक करून मोक्का अंतर्गत कारवाई करणार असून भिवंडीतील गुटखा माफियांचे कंबरडे मोडण्या साठी गुप्त माहिती घेऊन विशेष कारवाई भिवंडी शहरात केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी रईस शेख यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दिली आहे.