

Naresh Mhaske vs Rajan Vichare
ठाणे : राजकीय केंद्र असलेल्या ठाण्यात शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि माजी खासदार राजन विचारे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. संसदरत्न नव्हे वाचाळवीर पुरस्कार द्यायला हवे होते, नया नया बच्चा है, दरिद्री विचारांच्या आजोबांनी मानोसोपचार करून घ्यावे, तुझे जुने पुस्तक उघडेन असे एकमेकांचे उणेदुणे काढत म्हस्के - विचारे वाद आता रस्त्यावर आला आहे. तर गेली दोन आठवडे संसदेचा कामकाज बंद पडणारे आणि सनातन धर्माविरोधात बोलणारे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे बालिश बुद्धीचे कार्यकर्ते असल्याची टीका आज खासदार म्हस्के यांनी केली.
ठाण्यातील कोपरी पुलाच्या गटर्स पाहणी करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांना वाचाळवीर पुरस्काराने सन्मानित करायला हवे, अशी टीका केली. तसेच अतिरेक्यांना मारले तर काही मेहरबानी केली का? त्याचा एवढा डंका कशाला वाजविता असे विचारे यांनी म्हणत म्हस्के यांच्यावर निशाणा साधला. तो नया नया बच्चा असल्याची उपमाही दिली. त्याला प्रतिउत्तर देत खासदार नरेश म्हस्के यांनी भारतीय सैनिकांचा अपमान करणारे विचारे हे दरिद्री विचाराचे असल्याची टीका करीत निषेध व्यक्त केला. सहा वर्ष खासदार राहून फक्त स्टंटबाजी केली, कामे काहीच केली नाही, तुमच्या सारख्याला मतदान करून निवडून दिले, याची आम्हाला लाज वाटते, तुमची योग्यता नाही. काँग्रेससोबत राहून तुम्ही शेणात ही सुगंध घेऊ लागला आहात, त्याची विचारधारा स्वीकारणारे विचारे हे आजोबा असल्याचे म्हटले. त्यानंतर शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे मेंटल हॉस्पिटलबाहेर विचारे यांच्याविरोधात आंदोलन करीत भारतीय जवानांचे अपमान केले म्हणून माफी मागण्याची मागणी केली.
खासदार म्हस्के यांनी कडक शब्दात विचारे यांच्या हिंदुत्वासह त्याच्या गुंडगिरीवर टीका केली. त्याला पत्र लिहून विचारे यांनी प्रतिउत्तर देत सज्जड दम भरला आहे. विचारे पत्रात म्हणतात, वाचाळवीर हीच उपाधी तुम्हाला योग्य आहे. आमच्यावर काँग्रेसच्या वळचणीला गेल्याचे टीका करतो, पण एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून तू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होतास हे आठवते का? आणि तेव्हा याच राजन विचारेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर तुला शिवसेनेत परत आणले याचा विसर पडू देऊ नकोस. कोरोना काळात उंदरासारखा घरातल्या बिळात लपलेला तू, ठाण्यातील मनसेच्या नेत्याने डिवचल्यावर घराबाहेर पडला होतास. गद्दारी नसानसामध्ये भिनलेल्या तुझ्यासारख्यांनी आम्हाला देशभक्तीचे धडे देताना मी आजवर केलेल्या कामाची नुसती यादी आठव, म्हणजे तुला कळेल, गद्दार कोण आणि देशप्रेमी कोण? देशप्रेम मला काय शिकवतो, मी जे काही विधानं केली त्यात सैन्याच्या अवमानाचा प्रश्नच येत नाही. तुला फक्त घाणेरडे राजकारण करायची जणू सवयच जडली आहे. त्यामुळे आता तरी प्रगल्भ बुद्धी वापरण्यास सुरुवात कर. श्री मलंग गडावर एवढ्या वर्षांत एकदातरी पायरी चढलास का रे तू? त्या गडाखाली बसून खुशमस्कऱ्या, लावालावी करायचे हे तुझे जुने धंदे आता तरी सोड. तू आता सध्या ज्यांचे मीठ खातोस त्यांची सुद्धा निंदा नालस्ती करतोस. त्यांना काय कळते हे माझे डोके असे शब्द वापरून स्वतःचा फायदा करून घेतोस.
खबरदार! यापुढे शिवसेना आणि ठाकरे ब्रँड आणि माझ्याशी बोलताना तुझी औकात काय होती हे विसरू नकोस. घरापासून ते संसद भवनापर्यंत कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून आहेत. दिल्ली तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे उगाच आमच्या वाटेला जाऊ नकोस. मातोश्री, उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाबद्दल बोलताना जरा जपून. तुला एकच सल्ला देतो की, सुसंस्कृत राजकारण कर. मला तुझे पुस्तक उघडायला लावू नकोस, नाही तर भारी पडेल, असा इशारा दिला.
विचारे यांच्या या पत्रावर बोलताना म्हस्के म्हणाले, आमची युवा सेना सक्षम आहे, मी अशा लोकांना उत्तर देत नाही. उचार करून घ्या नाही तर आगामी पालिका निवडणुकीत पाचही नगरसेवक निवडून येणार नाहीत. सनातन धर्माबाबत बोलणारे आणि गोंधळ घालून गेले दोन आठवडे संसदेचा कारभार चालून न देणारे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे बालिश बुद्धीचे कार्यकर्ते असल्याची टीका म्हस्के यांनी केली.