

ठाणे : दिल्लीमध्ये कपिल शर्मा कॉमेडी शो व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे. मुंबईत बॉम्बस्फोटाबाबतच्या बदलत्या माहितीचे उदाहरण देत यापूर्वी तुमचे जे विजय झालेले आहेत ते अशा पद्धतीने झालेले आहेत का? लोकांच्या दरबारात तुम्ही गेला नव्हता का? त्याची नावे जाहीर करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाहीत? असा पलटवार करीत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी दोन अधिकाऱ्यांनी १६० जागा जिंकून देतो या शरद पवार यांच्या दाव्यावर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याकडे दोन अधिकारी आले आणि 160 जागा जिंकून आणून देऊ शकतो, असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली. त्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील दुजोरा दिला. त्यावेळी शिवसेना शिंदे पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी शरद पवार यांच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, 12 मार्च 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट झाला तेव्हा पवार यांनी सांगितलं होते 13 बॉम्बस्फोट झाले. काही महिने, वर्षानंतर त्यांनी सांगितलं 12 बॉम्बस्फोट झाले होते मी 13 हा आकडा जातीय सलोखा राखण्यासाठी घेतला होता. यावरून पवार यांच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा विचार जनता करेल. हा पवार यांचा इतिहास आहे.
जर ती दोन माणसे पवार यांना भेटण्यासाठी आली होती तर त्यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाईची मागणी करायला हवी होती. ते राहुल गांधींना भेटायला घेऊन गेले. नाना पटोले म्हणतात राहुल गांधींना भेटायला गेले नव्हते.. पवार म्हणतात राहुल गांधींना भेटायला गेलो राहुल गांधी तिथे नाही म्हणाले. जनतेच्या दरबारात जी काही निवडणूक आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये पराभव होणार हे माहित आहे म्हणून दिल्लीमध्ये कपिल शर्मा शो सुरू आहे आणि आता महाराष्ट्रात महाराष्ट्राची हास्य जत्रा शो सुरू आहे, असल्याची टीका म्हस्के यांनी केली.
मतदार यादीमध्ये घोळ निवडणूक आयोग यांना जिंकून आणतो हा सतत त्यांचा शोध सुरू आहे वेगळं काही सुरू नाही. राष्ट्रवादी आणि ठाकरे पक्ष फुटण्याच्या तयारी मध्ये आहेत, त्यांचे आमदार, खासदार यांच्याबरोबर राहण्यास तयार नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीचे वातावरण तयार करण्याचं एकमेव उद्योग सुरू आहे असल्याचेही म्हणाले.
त्या दोन माणसांची नावे सांगावी, त्या दोन माणसांविरुद्ध त्यावेळेस गुन्हा दाखल का केला नाही. त्याचे पुरावे द्यावे. एखादा गुन्हा करतो तो सुद्धा अपराधी असतो, गुन्हा करण्याकरिता जो त्याला मदत करतो किंवा प्रवृत्त करतो तो सुद्धा अपराधी असतो,असे म्हस्के म्हणाले.
वरळीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना मुद्दाम आदित्य ठाकरे आले. तिथे गडबड गोंधळ करायचा म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी हात उचलला की लोकांच्या दरबारात जाऊन रडायचं आणि सहानुभूती घ्यायची हा त्यांचा डाव होता, असा आरोप नरेश म्हस्के यांनी करीत महिलेला धक्काबुक्की केल्यावर तुमच्यावर गुन्हा नाही तर काय आरती करायची का? असे बोलून ठाकरे यांना डिवचले.