Thane News : कल्याणच्या होमबाबा, कचोरे टेकड्या वृक्षवल्लीविना भकास

निसर्गप्रेमी तथा पर्यावरणवाद्यांना साद; दरड कोसळण्याच्या भीतीने रहिवासी भयभीत
Kalyan Homebaba hill barren
कल्याणच्या होमबाबा, कचोरे टेकड्या वृक्षवल्लीविना भकासpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : बजरंग वाळुंज

कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या नेतिवलीच्या होमबाबा आणि कचोरे टेकड्या या वृक्षवल्लीविना भकास झाल्या आहेत. या टेकड्यांवर नागमोडी वळणे घेत चढणीवर एकावर एक वसलेली अनधिकृत घरे, गल्ली-बोळाच्या पायर्‍या चढत गटारे आणि नाल्यांवर लहानशा चौकोनात थाटलेले संसार, एका वेळी एकच व्यक्ती पार होऊ शकेल इतक्या निमुळत्या गल्लीतून घराकडे जाणारी चढती वाट, घराच्या खिडकीतून थेट नाल्यात टाकला जाणारा कचरा, असे चित्र मुख्य शहराला लागून असलेल्या होमबाबा/कचोरे टेकड्यांवर पहायला मिळते. मुसळधार पावसात येथे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे वृक्षवल्लीविना भकास झालेल्या या टेकड्या निसर्गप्रेमी तथा पर्यावरणवाद्यांना साद घालत आहेत.

गेल्या 10 ते 12 वर्षांपर्यंत या नेतिवलीच्या होमबाबा आणि कचोरे टेकडीचा पूर्व भाग झोपड्यांनी व्यापला होता. बांधकामासाठी सततचे खोदकाम, झोपडीतील सांडपाण्याचा जागीच होणारा निचरा, मलनिस्सारणाच्या टाक्या, महापालिकेचे याच टेकडीवर असलेले हजारो लिटरचे जल शुद्धीकरण केंद्र या सततच्या भाराने नेतिवली टेकडी वाकत चालली आहे.

मध्यंतरीच्या काळामध्ये मुंबई, तसेच ठाण्यात झोपड्यांवर कारवाई करण्यात येऊ न तेथील रहिवाशांना हुसकावून लावले. या कारवाईमध्ये बाधित झालेल्या झोपड्यांतील रहिवाशांनी नेतिवली टेकडीचा आधार घेऊन आपले बस्तान बसविले आहे. या टेकडीवर ऑक्टोबरपासून ते जून अखेरपर्यंत क्रमाक्रमाने भूमाफियांकडून झोपड्या बांधण्यात येत असल्याने एका रात्रीत झोपडी बांधण्याचे तंत्र तेथे वापरले जाते.

संरक्षक भिंत धोक्याच्या उंबरठ्यावर

टेकड्यांवरील वस्त्यांमध्ये आजच्या घडीला जवळपास साडेतीन हजारांहून अधिक घरे असून त्यात 15 ते 20 हजारांहून अधिक लोक राहतात. त्या लगतच कचोरे परिसर असून तेथील अडीचशे झोपड्यांमध्ये दोन हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करून राहतात. 26 जुलै 2005 च्या महाप्रलयंकारी पावसानंतर या भागात दगड आणि दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना महापालिका प्रशासनाने आखली नसल्याने येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. गेल्या 8 - 10 वर्षांत टेकडीवरील दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या असून आजही तेथील रहिवासी दरड कोसळण्याच्या भितीने जीव मुठीत धरून राहताहेत.

क्रांतिवीर फडके यांचे टेकडीवर वास्तव्य

जवळपास 15 एकर परिसरात पसरलेल्या या टेकडीच्या माथ्यावर क्रांतिवीर वासुदेव फडके यांचे काही काळ वास्तव्य होते. या टेकडीच्या उत्तर बाजुला एक गुहा आहे. या गुहेत त्यांनी टेहाळणीसाठी अनेक दिवस मुक्काम केला होता. तत्कालिन नगरसेविका सुधाताई साठे यांना वासुदेवांच्या ध्यान-गुंफेसंदर्भात माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी प्रभाकर पाठक, तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील, पद्माकर कुलकर्णी, कचोरे गावचे तत्कालीन सरपंच फकिरा चौधरी यांसह जाऊन पाहणी केली. पाठक यांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची प्रतिमा स्थापन केली. मात्र प्रशासनाने या पवित्र स्मृतीस्थळाकडे अद्यापही पाठच फिरवल्याचे दिसते.

झोपड्यांना धोका

या झोपडपट्ट्या टाटा पॉवरला लागूनच आहेत. त्यामुळे दुर्घटना घडल्यास मोठी जिवीत व वित्तहानी होऊन हाहाःकार होऊ शकतो.

रूपडेच पालटले

केडीएमसीला शहर सौंदर्यीकरणाचा पुरस्कार 2023 साली मिळाला. 10 कोटी रकमेचा हा पुरस्कार केडीएमसीने स्वीकारला. मात्र झोपडीधारकांना हव्या असलेल्या सोयी-सुविधा प्रशासनाकडून पुरवल्या जात नसल्याने आमदार निधी न वापरता मनसेचे नेते तथा तत्कालीन आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेत नेतिवलीच्या टेकडीचे रूपडेच पालटून टाकले.

वनराई गायब

सुधाताई साठे यांच्या निधनानंतर भुईडोंगरीच्या प्रेक्षणीय स्थळांचा प्रकल्प अपूर्ण राहिला. टेकडीवरील वनराई गायब झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news