

किशोर गायकवाड
मुरबाड शहर: मुरबाड शहरातील डोहळेपाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या डुकरांचा संशयास्पदरीत्या मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील आठवडाभरात या परिसरात सातहून अधिक डुकरे मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मृत डुकरे मानवी वस्तीच्या अगदी जवळ पडून असल्याने दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे या डुकरांचा मृत्यू होत आहे का, विषबाधा किंवा अन्य काही कारण आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, एकाच परिसरात अल्पावधीत एवढ्या मोठ्या संख्येने डुकरांचा मृत्यू होणे ही बाब निश्चितच गंभीर असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
मृत डुकरांची योग्य विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी, माशांचा प्रादुर्भाव तसेच संभाव्य संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मुरबाड नगरपंचायत, पशुसंवर्धन विभाग व आरोग्य विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून मृत डुकरांचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच परिसरातील भटक्या डुकरांची संख्या, त्यांची आरोग्य तपासणी आणि लसीकरणाची आवश्यकता याबाबतही प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. Mumbai Goa Highway: गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; राज्य सरकारचा निर्णय
ठोस उपाययोजनांची मागणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने केवळ मृत डुकरांची विल्हेवाट न लावता या मृत्यूमागचे खरे कारण शोधून नागरिकांना वस्तुस्थितीची माहिती द्यावी, तसेच डोळेपाडा परिसर भटक्या डुकरांच्या समस्येतून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.