Murbad ST Bus Breakdown: बसचालकाच्या चतुराईने अनेक प्रवाशांचा जीव वाचला

बसच्या इंजिनमधून अचानक धुराचे लोंढे बाहेर पडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण
Murbad ST Bus Breakdown
Murbad ST Bus BreakdownPudhari
Published on
Updated on

मुरबाड शहर: गुरुवारचा मुरबाड आगारासमोरील बस बिघाडीचा प्रसंग ताजा असताना रविवारी पुन्हा सकाळी मुरबाडवरून कल्याणकडे प्रवासी घेऊन निघालेली मुरबाड आगाराची आणखीन एक बस बरडपाडा परिसरात गंभीर बिघाडग्रस्त झाली.

प्रवास सुरू असतानाच एमएच 14 बीटी 1735 क्रमाकाच्या बसच्या इंजिनमधून अचानक धुराचे लोंढे बाहेर पडू लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत चालकाने गाडी तातडीने रस्त्याच्या कडेला घेतली. वाहकाने तत्काळ सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

Murbad ST Bus Breakdown
Kalyan Gas Pipeline Work: कल्याणमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम बंद; रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय गॅसवर

घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कुटुंबासह प्रवास करणारे स्थानिक प्रवासी विनोद भांडे यांनी सांगितले की, ‌‘अचानक धूर येऊ लागल्याने बसमध्ये एकच घबराट उडाली. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक घाबरून गेले होते.‌’ त्यानंतर प्रवाशांनी मिळेल त्या खासगी वाहनाने पुढचा प्रवास सुरू केला.

या घटनेनंतर पुन्हा तोच प्रश्न समोर आला आहे. मुरबाड आगारातील बसेसचे मेंटेनन्स पाहणारे अधिकारी नेमके करतात तरी काय? बस रस्त्यावर उतरवण्यापूर्वी तिची तांत्रिक तपासणी होते की नाही? की केवळ कागदावरच फिटनेस दाखवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे? गेल्या काही महिन्यांत मुरबाड आगाराच्या बसेस संदर्भात सतत गंभीर घटना समोर आल्या आहेत.

नुकताच काही दिवसांपूर्वीच बसच्या पुढील चाकाचा लायनर जाम होऊन गाडी डेपोच्या दारातच बंद पडली. बदलापूर-मुरबाड मार्गावरील बस झाडावर आदळून अनेक प्रवासी जखमी झाले. म्हसा यात्रेदरम्यान समोरचा टप निघालेल्या अवस्थेतील बस प्रवाशांसाठी रस्त्यावर धावत असल्याचे उघड झाले.

अनेक वेळा बसेस रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. काही बसांमधून ब्रेक, इंजिन, धूर, वायरिंग आणि बॉडी फिटिंगच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. मात्र प्रत्येक घटनेनंतर केवळ ‌‘दुरुस्ती सुरू आहे‌’, ‌‘मेंटेनन्सला पाठवू‌’, ‌‘तांत्रिक बिघाड होता‌’ अशी ठरलेली उत्तरे देऊन विषय दाबला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Murbad ST Bus Breakdown
Murbad Highway Project: मुरबाडचे ‌‘राष्ट्रीय स्मारक‌’ रस्त्यासाठी ठरतेय अडथळा?

तक्रारींचा ढीग पण कारवाई शून्य

आगार प्रमुख योगेश मुसळे यांच्या कार्यकाळात सतत तक्रारी, बिघाड, अपघात आणि प्रवाशांचे हाल समोर येत असतानाही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे ‌‘राजकीय आश्रयामुळेच अधिकारी मोकाट झाले आहेत का?‌’ असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

नवीन बसेस कुठे गायब झाल्या?

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते मुरबाड आगारासाठी नवीन सहा बसेसचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र त्या बसेस आता प्रत्यक्ष मुरबाडकरांच्या सेवेत क्वचितच दिसतात, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत.

तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शाबासकी मिळवण्यासाठी चांगल्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गांवर पाठवल्या जातात, तर मुरबाडकरांच्या वाट्याला जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि जीवघेण्या बसेस दिल्या जातात, असा आरोप स्थानिक प्रवासी करीत आहेत.

प्रवाशांचा थेट इशारा

दररोज हजारो विद्यार्थी, महिला, कामगार आणि ग्रामीण भागातील नागरिक एस.टी.वर अवलंबून आहेत. मात्र मुरबाड आगाराने त्यांना सुरक्षित सेवा देण्याऐवजी भीती आणि असुरक्षितता दिली आहे. ‌

‘मुरबाड परिवहन आगार सक्षम करा अन्यथा कायमचे बंद तरी करा,‌’ अशी संतप्त मागणी आता प्रवाशांमधून पुढे येत आहे. कारण हे असंच सुरू राहिलं, तर एखाद्या दिवशी ही जीर्ण, धुराडे सोडणारी आणि बिघाडग्रस्त बस मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देईल, अशी भीती आता उघडपणे व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता तरी परिवहन मंत्री लक्ष देईल का? असा सवाल मुरबाडचे प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news