

टोकावडे : मुरबाड तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, एकूण 196 स्वस्त धान्य दुकानांपैकी तब्बल 29 दुकाने आजही ऑफलाईन पद्धतीने सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. यामुळे गरिबांच्या धान्यावर डल्ला मारला जात असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून काही रेशनिंग दुकानदारांकडून धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने अनेक दुकाने ऑनलाईन प्रणालीशी जोडली होती. या प्रणालीमुळे वितरणात पारदर्शकता येण्याची अपेक्षा होती. मात्र, अद्यापही काही दुकाने ऑफलाईनच सुरू असल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
ऑफलाईन व्यवहारामुळे धान्य वितरणावर नियंत्रण राहत नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कार्डधारकांच्या म्हणण्यानुसार, “आमच्या हक्काचे धान्य पूर्ण मिळत नाही, मात्र नोंदीत सर्व काही दिल्याचे दाखवले जाते.” त्यामुळे गरिबांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, काही ठिकाणी दुकानदारांकडून अल्प प्रमाणात धान्य देऊन उर्वरित साठा काळ्या बाजारात वळवला जात असल्याचाही आरोप आहे. “गरिबांचे धान्य खाऊन दुकानदार मालामाल झाले,” अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीवर प्रश्नचिन्ह
प्रशासनाकडून या ऑफलाईन दुकानांबाबत अद्याप ठोस भूमिका स्पष्ट झालेली नाही. ही दुकाने ऑनलाईन कधी होणार, याबाबतही अनिश्चितता कायम आहे. एकीकडे धान्य कपात, तर दुसरीकडे ऑफलाईन व्यवहार यामुळे मुरबाड तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गरिबांच्या हक्काचे धान्य वाचवण्यासाठी ऑफलाईन दुकानदारांची सखोल चौकशी करून संबंधित दुकाने तात्काळ ऑनलाईन करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.