

खानिवडे: यंदाच्या उन्हाळ्यात कडक उकाड्याने नागरिक हैराण झाले असले, तरी या तडाखेबंद उन्हाचा सकारात्मक उपयोग जिल्ह्यातील महिला व महिला बचत गट करताना दिसत आहेत. पावसाळ्यात लागणाऱ्या कुरडया, पापड, पापड्या, सांडगे आदी वाळवणीच्या पदार्थांची तयारी करण्यासाठी सध्या गावोगावी लगबग सुरू आहे.
पालघर जिल्ह्यात तांदूळ व नागलीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उन्हाळा सुरू होताच या धान्यांपासून विविध वाळवणीचे पदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. सध्या पडत असलेल्या कडक उन्हामुळे वाळवण सुकवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून महिलावर्ग याचा पुरेपूर फायदा घेत आहे.
गाव-खेड्यांपासून शहरांपर्यंत महिला बचत गट सक्रिय झाले असून पापड, कुरडया, गव्हाचे सांडगे, शेवया, साबुदाण्याच्या पापड्या असे विविध पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहेत. हे पदार्थ केवळ चविष्टच नाहीत, तर त्यामागे महिलांची मेहनतही मोठी असते.पूर्वी घरांच्या अंगणात वाळवण करण्यासाठी मुबलक जागा असायची.
मात्र सध्याच्या शहरीकरणामुळे आणि महिलांच्या नोकरीच्या व्यापामुळे घरी वाळवण तयार करणे सर्वांसाठी शक्य होत नाही. त्यामुळे अनेक गृहिणी व बचत गट तयार पदार्थ बनवून दुकानदारांना पुरवठा करत आहेत. काही महिला घरगुती स्तरावर किंवा स्टॉल लावूनही विक्री करताना दिसतात. यामुळे त्यांना चांगले उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे.
साहित्याच्या किमती वाढल्या
एप्रिल-मे महिन्यांत वर्षभराचा साठा करण्याची परंपरा आजही कायम आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात, होळीच्या नैवेद्यासाठी या पापड्यांना विशेष महत्त्व असते. दरम्यान, वाळवणीच्या साहित्याच्या किमती वाढल्यामुळे महिलांवर आर्थिक ताण पडत आहे. गेल्या वर्षी शेकडा 150 ते 200 रुपयांपर्यंत मिळणारे वाळवण आता 250 ते 300 रुपयांपर्यंत विकले जात आहे. तरीदेखील या पदार्थांना मोठी मागणी कायम असल्याने महिलांचा उत्साह कमी झालेला नाही.