

पुणे: शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होताच खासगी टँकर व्यावसायिकांनी नागरिकांच्या अडचणीचे भांडवल करण्यास सुरुवात केली आहे. पाणीटंचाईचे कारण पुढे करत टँकरच्या दरात थेट दीडपट वाढ करण्यात आली असून, पूर्वी ७०० रुपयांना मिळणारा टँकर आता १,२०० ते १५०० रुपयांना विकला जात आहे. महापालिकेकडून टँकर दरांवर नियंत्रण ठेवण्याच्या घोषणा वारंवार केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने टँकरमाफियांची मनमानी वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
महापालिकेने धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे शहरात सम-विषम तारखेनुसार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. या निर्णयानंतर अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना पाण्याची कमतरता भासू लागली असून, त्यांनी खासगी टँकरचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, वाढलेल्या मागणीचा फायदा घेत अनेक टँकरचालकांनी दरात मोठी वाढ केली आहे. 'पाणी उपलब्ध नाही, दूरवरून आणावे लागते, असे कारण सांगत वाढीव दर आकारले जात आहेत. याचा सर्वाधिक फटका महापालिकेत समाविष्ट गावांतील नागरिकांना बसत आहे. सुस, म्हाळुंगे, वाघोली आणि इतर उपनगरांतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना वाढीव दरानेच पाणी खरेदी करावे लागत आहे. काही ठिकाणी पैसे मोजूनही टँकर वेळेवर पोहोचत नसल्याने सोसायट्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि दैनंदिन वापरासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेच्या टँकरसाठी प्रतीक्षा
महापालिकेच्या टँकरसाठी नागरिकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही समोर येत आहे. काही भागांमध्ये टँकर वेळेत मिळावा, यासाठी चालकांना अतिरिक्त पैसे अथवा 'चिरीमिरी' द्यावी लागत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
जलतरण तलावांवर नावालाच निर्बंध
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करतानाच वॉशिंग सेंटरला व जलतरण तलावांवर निर्बंध घालण्याचे जाहीर केले होते. सोसायट्यांमध्येही वाहने धुण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी महापालिकेचे आदेश धुडकावून लावून अनेक ठिकाणी वॉशिंग सेंटर सुरू आहेत. महापालिकेने पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतु:शृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत. महापालिकेकडे १२८२ रुपयांचे चलन जी व्यक्ती किंवा सोसायटी भरते त्यांना महापालिकेच्या टँकरमधून पाणी पुरविले जाते. तर खासगी टँकरधारकांना महापालिकेकडून एका टँकरसाठी ६६६ रुपयांचा पास दिला जातो. ते पाणी त्या टँकर चालकाने किंवा मालकाने किती रुपयांना विकावे, यासंबंधी कसलेही बंधन नाही.
पाणी कपात लागू केल्यापासून आमच्या सोसायटीला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर मालकांनी पाण्याचे दर वाढवले आहे. पूर्वी एका टँकरसाठी आम्ही ७०० रुपये द्यायचो. आता आम्हाला पाणी मिळत नसल्याचे कारण सांगत १२०० रुपये एका टँकरला द्यावे लागतील, असे सांगितले जात आहे.
अक्षय पाटील, अध्यक्ष, किरण समृद्धी सोसायटी, सूस गाव
पाणी कपातीनंतर खासगी टँकरचे दर वाढल्याच्या तक्रारी समोर येत असल्या तरी महापालिकेकडे अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झाली नाही. दूरच्या भागातून पाणी आणावे लागत असल्याने इंधन खर्च वाढत आहे. परिणामी काही प्रमाणात दरवाढ होऊ शकते. तरीही नागरिकांची अवाजवी आर्थिक लूट होऊ देणार नाही. टँकर दर नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची गरज असून यासाठी टँकर चालक-मालक, महापालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घेण्याची तयारी सुरू आहे.
मंजूषा नागपुरे, महापौर
आपत्कालीन स्थितीचा गैरफायदा घेऊन टँकरचे दर दीडपटीने वाढवणे हे अत्यंत अमानवी कृत्य आहे. संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्यांची अशी आर्थिक पिळवणूक करणे अत्यंत चुकीचे आहे. याची गंभीर दखल घेऊन दरवाढ करणाऱ्या टँकर चालकांवर कठोर कारवाई करण्यासह थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका लवकरच टँकरचे दरांबाबत आणि नियोजनाबाबत नवीन नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असून, त्याचे पालन करणे अनिवार्य राहील.
नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका