

किशोर गायकवाड
मुरबाड शहर: मुरबाड शहरातील राष्ट्रीय महामार्ग 61 वरील नव्याने उभारण्यात आलेला उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला, तरी पुलाखालून वर पाहिल्यानंतर पुलाच्या काँक्रीट संरचनेवर तडे सदृश्य रेषा दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर उड्डाणपूल हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक दुवा मानला जात असून, दिवस-रात्र हजारो वाहने या पुलावरून प्रवास करीत असतात. विशेष म्हणजे पुलाखालील परिसरात अनेक छोटी दुकाने, हातगाड्या तसेच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची नियमित वर्दळ असते.
त्यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या तळभागावर दिसणाऱ्या या रेषा नेमक्या साधारण काँक्रीट जॉइंटच्या आहेत की प्रत्यक्ष तडे आहेत, याबाबत अधिकृत खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. परिणामी परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
स्पष्टीकरणाची मागणी...
कामात काही तांत्रिक त्रुटी राहिल्या आहेत का? पुलाची अंतिम दर्जा तपासणी आणि संरचनात्मक परीक्षण पूर्ण झाल्यानंतरच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, अनेकदा काँक्रीट सुकण्याच्या प्रक्रियेत किंवा बांधकामातील सांध्यांमुळे काही रेषा दिसू शकतात; मात्र त्याचे स्वरूप नेमके काय आहे, हे अधिकृत तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे नागरिकांकडून कोणताही निष्कर्ष न काढता प्रशासनाने तातडीने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.
पुलाची सखोल तपासणी आवश्यक
जर ही बाब केवळ वरवरची नसून संरचनात्मक कमकुवतपणाशी संबंधित असेल, तर भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत पुलाची सखोल तपासणी करून अहवाल जाहीर करावा, तसेच आवश्यक असल्यास परिसरात सूचना फलक लावून नागरिकांना सतर्क करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.