Thane News : ब्रिटिशकालीन मुरबाडची जलव्यवस्थापन योजना उजेडात

सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीच्या दूरदृष्टीचा ओलावा आजही जिवंत
historical water management
ब्रिटिशकालीन मुरबाडची जलव्यवस्थापन योजना उजेडातpudhari photo
Published on
Updated on

मुरबाड शहर : किशोर गायकवाड

मुरबाड तालुक्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पण दुर्लक्षित पान अखेर प्रकाशझोतात आले आहे. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी, ब्रिटिश काळात उभारण्यात आलेल्या जलव्यवस्थापनाच्या योजनांची माहिती समोर आली असून, त्या काळातील प्रशासनाची दूरदृष्टी आणि नियोजनक्षमतेचे दर्शन घडते.

ब्रिटिश राजवटीत मुरबाड हे एक महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र मानले जात होते. त्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, जनावरांना पाणी उपलब्ध व्हावे आणि घाटमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोय व्हावी या उद्देशाने 1895 ते 1900 या कालावधीत विविध ठिकाणी तलावांची निर्मिती करण्यात आली होती.

historical water management
Wada industrial pollution: गुदमरलेल्या वाडावासीयांना हवाय मोकळा श्वास; आधी टायर कंपन्या, आता फटाका कारखाना, भविष्यात क्रशर प्लांट?

ही माहिती 1904 साली प्रकाशित झालेल्या “प्रोसीडिंग्स ऑफ द कौन्सिल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे” या अहवालातून समोर आली आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती मुरबाड इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेंद्र शांताराम बांगर यांनी ब्रिटिशकालीन कागदपत्रांच्या अभ्यासातून उलगडली आहे.

या अहवालात मुरबाड तालुक्यातील साखरे, बांधिवली, भुवन, सायले, दहिगाव, माळ, फणसोली, साजई, तळवली (तर्फ वैशाखरे) आणि मुरबाड या गावांमध्ये तलाव बांधकाम पूर्ण झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. विशेष म्हणजे, या कामांमागील उद्देश केवळ पाणीपुरवठा नव्हता, तर त्या काळातील अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हाही होता.

मुरबाडच्या मातीत दडलेला जलइतिहास...

आजही यापैकी बहुतांश तलाव सुस्थितीत असून, ते त्या काळातील जलव्यवस्थापनाच्या भक्कम नियोजनाची साक्ष देतात. आधुनिक युगात पाणीटंचाईच्या समस्यांशी झुंज देताना, या ऐतिहासिक वारशाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज अधोरेखित होत आहे. मुरबाडच्या मातीत दडलेला हा जलइतिहास केवळ भूतकाळाचा ठेवा नसून, भविष्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो.

historical water management
Diesel Price Impact Fishing: डिझेल दरवाढीचा फटका! रायगडमध्ये मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावरच

तलाव उभारणीस योगदान...

इतिहासाच्या पानांवर नोंद झालेल्या या जलसंपत्ती उभारणीत महत्त्वाची काही व्यक्तींनी भूमिका बजावली होती. बांधिवली येथील तलाव बांगरपाडा येथील कान पाटील गोविंद पाटील बांगर यांनी सुमारे 3000 रुपयांच्या खर्चातून उभारला होता. तसेच, साखरे येथील तलाव भालचंद्र बळवंत शिरोरकर, माळ येथील तलाव कृष्णाजी बळवंत शिरोकर, भुवन येथील तलाव नारायण भानुशेठ, फणसोली येथे लक्ष्मण विनायक जोशी, साजई येथे दिनकर बाळकृष्ण जोशी, तळवली (तर्फ-वैशाखरे) येथे कोंडा गोविंद पाटील आणि मुरबाड येथे केशव विठ्ठल प्रधान यांनी तलाव उभारण्यात योगदान दिल्याचे नमूद आहे. सायले व दहिगाव येथील तलावांची नोंद असली तरी त्यांचे निर्माते मात्र नोंदवले गेलेले नाहीत.

प्रवाशांसाठी बांधलेले तलाव...

या ऐतिहासिक दस्तावेजातून आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट होते. साखरे, तळवली आणि मुरबाड येथील तलाव हे विशेषतः प्रवाशांसाठी बांधले गेले होते. यावरून त्या काळातील प्रमुख प्रवासाचे मार्ग मुरबाड-साखरे-वैशाखरे असा असल्याचे संकेत मिळतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news