

मुरबाड शहर : किशोर गायकवाड
म्हसा गावची सुप्रसिद्ध खांबलिंगेश्वर देवाची 15 दिवस चालणारी यात्रा ही भाविकांच्या अपार श्रद्धेचा एक बाजूला परिचय आहे, तर दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांसाठी मोठ्या उलाढालीचेही ठिकाण आहे. या यात्रोत्सवात कोट्यवधीची उलाढाल होते ती उंटांच्या माल वाहून नेण्याच्या जिद्दी कहाणीमुळे. आता सुरू झालेल्या म्हसा यात्रेत पुण्याहून विक्रम शिंदे यांचे चार उंट दाखल झाले आहेत. त्यांचाही व्यापारी उलाढालीत मोठा वाटा आहे.
3 जानेवारी रोजी विकी शिंदे हा आपल्या तीन भावांसह चार उंट घेऊन म्हसा यात्रेत दाखल झाला. फक्त इथपर्यंत पोहोचण्यासाठीच त्याला तब्बल 30 हजार रुपये टेम्पो भाडे मोजावे लागले. “संसाराची पुंजी वाढावी, कष्टातून काहीतरी मिळावं,” या आशेने तो येथे आला आहे. हे उंट त्याने राजस्थानमधून सुमारे सहा लाख रुपयांना विकत घेतले आहेत. गेली 89 वर्षे हे उंट त्याच्या कुटुंब उदरनिर्वाहाचे सोबती असून हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय आहे. “आम्ही या व्यवसायात चौथी पिढी आहोत,” असे तो अभिमानाने सांगतो.
विकी शिंदे यांचे कुटुंब नाथ-जोगी संप्रदायातील. पूर्वी झोळी घेऊन दीक्षेसाठी गावोगावी फिरण्याची परंपरा होती. मात्र समाजाकडून मिळणारे टोमणे, हीन वागणूक आणि “तरुण, हट्टेकट्टे असून भीक का मागतोस?” असे तिखट शब्द त्यांच्या मनावर खोल घाव घालणारे ठरले. याच जखमांतून त्यांनी हा व्यवसाय स्वीकारल्याचे विकी सांगतो.
“हे उंट माझ्या कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत,” असे सांगताना त्याच्या शब्दांत जिव्हाळा स्पष्ट जाणवतो. एका उंटावर दररोज 500 ते 600 रुपयांचा खर्च येतो. कधी आजारपण, कधी उपचार, तर कधी अचानक येणाऱ्या अडचणी, हे सगळं सांभाळत हा व्यवसाय टिकवावा लागतो. याखेरीज अनेकदा काही सरकारी यंत्रणांकडून चौकशी, अडवणूक आणि त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व कागदपत्रे आणि सर्टिफिकेट कायम सोबत ठेवावी लागतात. “हे सगळं कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सहन करावं लागतं,” असे तो म्हणतो.
मात्र यंदा म्हसा यात्रेत मंदीचे सावट असल्याने खर्ची लागेलेले भाडेही वसूल झाले नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. त्यामुळे आणखी दोन दिवस गर्दीचा अंदाज घेऊन तो कल्याण-उल्हासनगरच्या दिशेने रवाना होणार असल्याचा खुज्या म्हणाला. लहान मुलांचे वाढदिवस, लग्नसमारंभ, गणपती उत्सव, उरूस तसेच चित्रपट व जाहिरात शूटिंगसाठी त्याच्या उंटांना मागणी असते. तरीही सध्या हा व्यवसाय केवळ आशेवर चाललेला आहे.
म्हसा यात्रेतील ही उंटांची कहाणी केवळ एक व्यवसायाची गोष्ट नाही; ती आहे समाजाच्या कडेलोटावर उभ्या असलेल्या कुटुंबांची, अपमान झेलूनही जगण्यासाठी झगडणाऱ्या माणसांची आणि कष्टावर विश्वास ठेवणाऱ्या जिद्दीची... जी गर्दीच्या गोंगाटात अनेकदा दुर्लक्षित राहते!