

सापाड (ठाणे) : योगेश गोडे
आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणांमध्ये मोठे उलथापालथ घडत आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने आज एकाचवेळी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन्ही पक्षांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर तसेच ठाकरे गटातील उपशहर प्रमुख दादा किस्मतराव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, हा पक्षप्रवेश ठाण्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यामध्ये कल्याण आणि डोंबिवली परिसरातील काही प्रभागांतील राजकीय तगडे चेहरे सामील होणार असल्याने महापालिका निवडणुकीतील राजकीय लढत आणखी चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी असताना, स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व असलेल्या माजी नगरसेवक आणि पदाधिकार्यांचा शिंदे गटात प्रवेश हा मोठा रणनीतिक फायदा ठरणार आहे. ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा धक्का असला, तरी शिंदे गटासाठी हा मनोबल वाढवणारा निर्णय मानला जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हा पक्षप्रवेश सोहळा ठाण्यात पार पडला असून, यावेळी शिवसेनेतील वरिष्ठ नेते, मंत्री व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक पातळीवर मतदारसंघनिहाय मजबूत नेत्यांना आपल्या गटात आणण्याच्या धोरणाचा हे महत्वाचे पाऊल आहे.