

डोंबिवली : डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या खोणी गावाजवळील पलावा गृहसंकुल परिसरात मोकाट कुत्र्यांची प्रचंड संख्येने वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी तेथील आर्केड सोसायटीमध्ये धक्कादायक घटना घडली.
शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीवर चार-पाच भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. सुदैवाने सोसायटीतील सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत कुत्र्यांना हुसकावून लावल्यामुळे मुलीचा जीव वाचला असला तरी अशा उपद्रवी कुत्र्यांमुळे लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
परिसरातील रहिवासी घरातील खरकटे, अन्न, अशा पदार्थांवर रस्त्यावरील भटकी कुत्री आपले उदरभरण करत असतात. दिवसेंदिवस कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्थानिक रहिवाशांनी या संदर्भात अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
सोमवारी घडलेला हा संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर व्हिडिओमध्ये कुत्र्यांचा ४ ते ५ कळप तेथून जाणाऱ्या शाळकरी मुलीच्या दिशेने धावत येताना दिसत असून सुरक्षा रक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. अन्यथा त्या मुलीचे कुत्र्यांनी लचके तोडले असते. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने निर्बिजीकरण मोहीम, कुत्र्यांचे स्थलांतर व नियंत्रणासाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.