Mumbra Gutkha Sale: मुंडेंची मोहीम एकीकडे; मुंब्र्यात गुटखा चोहीकडे

बंदी असूनही स्टेशन-कौसा परिसरात पहाटेपर्यंत खुलेआम विक्री; कॅन्सर विकणाऱ्यांना कोणाचे संरक्षण?
Mumbra Gutkha Sale
Mumbra Gutkha SaleAI Photo
Published on
Updated on

ठाणे: राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही मुंब्रा परिसरात सर्रासपणे सुरू असलेल्या गुटखा विक्रीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर गुटखा माफियांविरोधात धडक मोहीम उघडली असताना, मुंब्रा रेल्वे स्थानक आणि कौसा परिसरात मात्र मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे चित्र आहे.

तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुटखा उत्पादक, साठेबाज आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा सपाटा लावला आहे. राज्यभर छापे, जप्ती आणि गुन्हे दाखल करण्याच्या कारवायांमुळे गुटखा व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

Mumbra Gutkha Sale
Accident News: मनोर-वाडा भिवंडी महामार्ग ठरतोय धोकादायक, ४ वाहनांचा विचित्र अपघात

मात्र मुंब्र्यातील वास्तव याच्या अगदी उलट असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, स्टेशन परिसर, जिवनबाग, मार्केट, कौसा आणि काही अंतर्गत भागांमध्ये गुटखा विक्रेते कोणत्याही भीतीशिवाय व्यवसाय करत आहेत.

विशेष म्हणजे, स्टेशन परिसरात छोट्या छोट्या बॉक्स टपऱ्यांमध्ये पहाटेच्या वेळेत गुटखा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचेही सांगितले जात आहे. गुटख्याच्या वाढत्या सेवनामुळे तरुणाई कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या विळख्यात अडकत असताना प्रशासनाची ही निष्क्रियता अधिकच चिंताजनक मानली जात आहे.

एका बाजूला आयुक्त मुंडे राज्यभर अवैध गुटखा व्यवसाय मोडून काढण्यासाठी झटत असताना, दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर त्यांच्या आदेशांना हरताळ फासला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. गुटखा विक्रेत्यांनी बंदीचा फायदा घेत चढ्या दराने विक्री सुरू ठेवली असून या काळ्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंब्र्यातील गुटखा विक्रीला नेमका कोणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

Mumbra Gutkha Sale
Karjat Roha Connectivity: कर्जत रोहा थेट नवा रेल्वेमार्ग; १७२ कोटींच्या 'सोमटाणे-चिखली कॉर्ड लाईन' प्रकल्पाला मंजुरी

मुंब्र्यात गुटखा मिळतो की नाही, याचे उत्तर प्रशासनाच्या अहवालात नाही तर रस्त्यावर पडलेल्या रिकाम्या गुटख्याच्या पुड्यांमध्ये दिसते. शहरातील अनेक रस्ते, चौक आणि नाल्यांमध्ये गुटख्याच्या रिकाम्या पुड्यांचा अक्षरशः खच पडलेला दिसत असून, बंदी असूनही गुटख्याची विक्री आणि सेवन किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे, याचीच ती साक्ष देत आहे.

पोलिसांच्या कारवाया संशयाच्या भोवऱ्यात?

मुंब्र्यात गुटखा विक्री खुलेआम सुरू असल्याचा आरोप होत असताना पोलिसांच्या कारवायांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अधूनमधून कारवाईचा फार्स रचून गुटखा विक्रेत्यांवर धाक निर्माण केल्याचे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात गुटखा विक्री करणाऱ्यांऐवजी केवळ सिगारेट विक्री करणाऱ्या काही छोट्या दुकानदारांवरही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे.

कारवाईची आकडेवारी वाढवण्यासाठी आणि वरिष्ठांना अहवाल सादर करण्यापुरत्याच या मोहिमा राबवल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे गुटखा विक्रीच्या मूळ साखळीवर कारवाई होणार की केवळ कागदोपत्री धाडसत्र सुरू राहणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news