

ठाणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने देखील आता शहरातील बेकऱ्या इंधनामध्ये परावर्तित करण्यासाठी महत्वाची पाऊले उचलली आहेत. ठाणे शहरात सध्या 100 पेक्षा अधिक लहान मोठ्या बेकऱ्या असून या सर्व बेकऱ्या कोळसा आणि लाकडावर सुरु आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून हे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने या सर्व बेकऱ्यांना इंधनामध्ये परावर्तित करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नोटिसा देण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी या सर्व बेकरी मालकांचे प्रबोधन करण्याचा दृष्टीने नुकतेच ठाणे महापापालिकेच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला सर्वच बेकारी मालक आणि हॉटेल व्यावसायिकांनी हजेरी लावली होती.
शहरात प्रदूषण करणाऱ्या घटकांना आळा घालण्यासाठी पालिका स्तरावर महत्वाची पाऊले उचलण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने तब्बल 55 बांधकामांना कामे थांबवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. ठाणे महापालिकेने देखील शहरातील काही बांधकामांना नोटिसा दिल्या असल्या तरी अद्याप कोणाला काम थांबवण्याचे आदेश दिलेले नाहीत. मात्र केवळ बांधकामांमुळेच प्रदूषण होते असे नाही तर शहरातील बेकऱ्यांमुळे देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने देखील शहरातील सर्व बेकऱ्या सीएनजी, एलपीजीमध्ये परावर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ज्या बेकऱ्या सुरु आहेत त्या एक तर लाकडावर किंवा कोळशावर सुरु आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड देखील होत असून कोळशामुळे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हे प्रदूषण कमी करण्यासाठी लवकरच या सर्व बेकऱ्याना इंधनामध्ये परावर्तित करण्यासाठी पालिकेच्या वतीने नोटीस दिली जाणार आहे.
बेकरीचालकांची मानसिकता देखील बदलणे आवश्यक
शहरात 100 पेक्षा अधिक बेकऱ्या असून या सर्व बेकऱ्यांना इंधनामध्ये परावर्तित करणे लवकर शक्य होणार नाही. यासाठी बेकऱ्यांना काही प्रमाणात खर्च देखील करावा लागणार आहे. याशिवाय त्यांची मानसिकता देखील बदलणे आवश्यक असल्याने जनजागृती करण्याच्या दृष्टीने यासंदर्भात नुकतेच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका, वी आर आय इंडिया आणि आसर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बेकारी इंधनामध्ये बेकारी कशी परावर्तित करायची? त्याला खर्च किती आहे आणि यामुळे काय फायदा होणार आहे याची सर्व माहिती देण्यात आली अशी माहिती प्रदूषण विभागाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांनी दिली.