

ठाणे : मी नास्तिक असलो तरी माझा माणसांवर आणि माणसांच्या चांगुलपणावर विश्वास असल्याचा विश्वास ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केला. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या रौप्य महोत्सव विशेष वाचन कट्ट्यावर शुक्रवारी अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी व लेखिका संध्या गोखले यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ही मुलाखत अजय वाळिंबे यांनी घेतली. यावेळी ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्याध्यक्ष चांगदेव काळे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रणाली राजे व वृषाली राजे यांनी यांनी संध्या गोखले यांचे स्वागत केले.
आपण केलेल्या चुकांचे खापर दुसर्यांवर फोडण्याऐवजी माझे काय चुकले हे पाहिले जात नाही, चुका मान्य केल्या जात नाही, उलट दैवाला दोष दिला जातो. त्यामुळे माझा दैव, नशिब यावर विश्वास नसला तरी माझा माणसांवर विश्वास असल्याचे पालेकर म्हणाले. आपल्या चित्रपटांवर सत्यदेव दुबे, बासु चटर्जी आणि ऋषिकेश मुखर्जी यांचा प्रभाव असल्याचे पालेकर म्हणाले. सत्यदेव दुबेंनी आपल्याला नकळत शिस्त शिकवली, रंगभूमीच्या बलस्थानांची जाणीव करून दिली आणि प्रेक्षकांचा आदर आणि प्रेम कसं जपायचे, हे शिकवले, तर बासु चटर्जी यांनी साधं, सरळ आणि हसत खेळत कथानक कसं सादर करायचा, हे सांगितले. तर ऋषिकेश मुखर्जीकडून मी चित्रपटासाठीचा गृहपाठ शिकलो. या तिन्ही दिग्दर्शकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले, मला चांगले चित्रपट दिले आणि मला घडवलेही, असे त्यांनी नमूद केले.
संध्या गोखले म्हणाल्या, साहित्यावर आधारित कलाकृती करतांना चित्रपट दिग्दर्शक स्वातंत्र्य घेतो, हे त्याचे माध्यम आहे, त्यामुळे त्या दृष्टीकोनातून असे चित्रपट पाहिल्यास आपले वैचारिक घोळ होणार नाहीत. आपल्याकडे प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची नजर तयार होण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. कार्याध्यक्ष चांगदेव काळे यांनी आभार मानले. मी अमूर्त शैलीत चित्र काढतो. अमूर्त चित्रकला आपल्याकडे प्रेक्षकांना कळत नाही असे म्हटले जाते, पण जे काही अभिजात आहे, संगीत, चित्रकला त्या कलाकृतीतून आनंद घेण्याची वृत्ती असली पाहिजे, पण आपल्याकडे त्याची कारणमीमांसा केली जाते, त्यामुळे शब्दांच्या पलीकडे जाऊन या कलाकृतींचा आस्वाद घेण्याची गरज असल्याचे मत पालेकर यांनी व्यक्त केले.
अमोल पालकेरांना पद्म पुरस्कार मिळायला हवा होता. पण पालेकर यांनी सातत्याने शासनाच्या विरोधात भूमिका घेतल्याने हा पुरस्कार त्यांच्यापासून दूर राहिल्याचे मत पालेकर यांच्या पत्नी व लेखिका संध्या गोखले यांनी व्यक्त केले, पक्षीय राजकारणात त्यांना रस नाही, पण आयुष्यभर जिथे जिथे अन्याय दिसेल त्या विरोधात पालेकर यांनी भूमिका घेतली आणि त्याची किंमतही त्यांनी त्यासाठी मोजली असल्याचे त्या म्हणाल्या.
मी चित्रपटात यशस्वी झाल्याने नाटकाकडे मी पाठ केली, असा माझ्याबद्दल समज आहे, हा समज वस्तिनिष्ठ असला तरी मी अभिनेत्याबरोबरच दिग्दर्शक आणि निर्माताही झाल्याने त्या जबाबदार्यांवर मी लक्ष केंद्रीत केल्याने नाटक मागे पडल्याची खंत आहे. चित्रपटाचा प्रेक्षकांवर आधिक प्रभाव असतो. तर नाटक ही जीवंत कला असला तीर त्याचा प्रभाव क्षणभंगूर असल्याचे मतही पालेकर यांनी व्यक्त केले.