Mumbai Mandwa Ferry:मुंबई-मांडवा जलवाहतूक बंद; रायगडकडे जाणाऱ्या प्रवाशांचा एसटीवर वाढला ताण

सुट्यांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग आगार सतर्क; अतिरिक्त बसेसची तयारी
Mumbai Mandwa Ferry
Mumbai Mandwa FerryPudhari
Published on
Updated on

ठाणे: रायगड जिल्ह्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, त्यातच मुंबई-मांडवा जलवाहतूक सेवा बंद झाल्याने प्रवाशांचा संपूर्ण भार एसटी महामंडळावर पडला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक पर्यटकांनी समुद्रकिनारे, किल्ले आणि पर्यटनस्थळांसाठी रायगडकडे मोर्चा वळवला आहे.

शनिवार-रविवारी अलिबाग, मुरुड आणि आसपासच्या भागातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि कॉटेजेस हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जलवाहतूक बंद पडल्याने मुंबईहून रायगडकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वे आणि रस्तेमार्गाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

परिणामी, एसटी बसस्थानकांवर मोठी गर्दी होत असून प्रवासाचा वेळ दुप्पट ते तिप्पट वाढला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अलिबाग एसटी आगाराने अतिरिक्त बसेसची तयारी सुरू केली आहे.

दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात रायगड जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यंदाही जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शाळांना सुट्ट्या असल्याने अनेक कुटुंबांनी पर्यटनाचा बेत आखला आहे.

काही नागरिक मूळ गावी परतले असून, तर अनेक पर्यटक अलिबाग, मुरुड, काशीद, रोहा आणि पेण परिसरात दाखल झाले आहेत. मात्र, याच काळात मुंबई-मांडवा जलवाहतूक सेवा बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पूर्वी बोटीने अवघ्या एका तासात होणारा प्रवास आता रस्तेमार्गाने 3 ते 4 तासांचा झाला आहे.

जलवाहतूक बंद असल्याने मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना प्रथम रेल्वेने पनवेल गाठावे लागत आहे. त्यानंतर पनवेलहून एसटी किंवा खासगी वाहनाने अलिबाग आणि इतर भागात जावे लागत असल्याने वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

Mumbai Mandwa Ferry
Thane TDR Controversy: ठाणे महापालिका टीडीआर घोटाळ्यामागे आहे कोण? आमदार जितेंद्र आव्हाड यांचे महापालिकेवर गंभीर आरोप

अलिबाग, पेण, रोहा आणि मुरुडकडे जाणाऱ्या बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. वाढत्या गर्दीमुळे अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागत असून, वाहतूक कोंडीमुळे बससेवांचे नियोजनही विस्कळीत होत आहे. जुन्या बसेस आणि अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांच्या अडचणीत अधिक भर पडत आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अलिबाग एसटी आगार प्रशासनाने विशेष नियोजन सुरू केले आहे. विना थांबा फेऱ्या वाढविण्यासोबतच कर्जत आणि पेण आगारातून अतिरिक्त बसेस मागविण्यात येणार आहेत.

गरजेनुसार आणखी बससेवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पर्यटन हंगाम आणि जलवाहतूक बंदी या दुहेरी परिस्थितीमुळे येत्या काही दिवसांत रायगडमधील रस्ते वाहतुकीवरील ताण आणखी वाढणार आहे. विशेषतः आठवड्याच्या शेवटी प्रवाशांनी वेळेचे नियोजन करून प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

मुंबई-अलिबाग प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था

  • मुंबईहून प्रथम रेल्वेने पनवेल गाठावे

  • पनवेलहून एसटी बस किंवा खासगी वाहनाने अलिबागकडे प्रवास

  • शनिवार-रविवारी अतिरिक्त गर्दीची शक्यता

  • अलिबाग आगाराकडून जादा बसेसची व्यवस्था

  • प्रवासासाठी 3 ते 4 तासांचा अतिरिक्त वेळ गृहीत धरण्याचे आवाहन

  • पर्यटकांनी आगाऊ हॉटेल बुकिंग आणि प्रवास नियोजन करावे.

जलवाहतूक सेवा बंद झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत. अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली जात असून, प्रवाशांना वेळेत त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

- राकेश देवरे, व्यवस्थापक, अलिबाग एसटी आगार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news