

डोंबिवली: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या, अडीअडचणी आणि आर्थिक मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेना संलग्न असलेल्या या संघटनेने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ठोस भूमिका घेतली असून परिवहन मंत्री सरनाईक यांनी देखिल सकारात्मक प्रतिसाद देऊन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक करण्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी शिष्टमंडळात राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष पंकज वालावलकर, राज्य चिटणीस व्यंकटराव बिरादार, विधी सल्लागार आबासाहेब शिंदे, विठ्ठल व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटीचा कर्मचारी हा राज्याच्या दळणवळणाचा कणा आहे. त्यांच्या न्याय्य हक्कासाठी शासन कटिबद्ध आहे.
निवेदनातील सर्व तांत्रिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सकारात्मक विचार करून प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिले. या यशस्वी पाठपुराव्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण असून, प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असल्याचा आशावाद संघटनेचे ठाणे विभागीय अध्यक्ष योगेंद्र कदम यांनी व्यक्त केला.
निवेदनातील प्रमुख मागण्या
आर्थिक लाभ : 1 एप्रिल 2026 पासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढीमधील फरकाची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. तसेच, मे 2026 च्या वेतनात सुधारित महागाई भत्ता लागू करून फरकाची रक्कम एकरकमी द्यावी.
वैद्यकीय सुविधा : एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने कॅशलेस वैद्यकीय सेवा सुरू करावी. तसेच, आगारांमधील कर्मचाऱ्यांची सुमारे 40 ते 50 लाखांची प्रलंबित वैद्यकीय बिले निधी उपलब्ध करून तत्काळ द्यावीत.
पास सवलत : कौटुंबिक आणि सेवानिवृत्ती पासेसवर प्रवास करताना कर्मचाऱ्यांना जास्तीची फरकाची रक्कम भरावी लागू नये, अशी मुभा देण्यात यावी.
प्रशासकीय सुधारणा : नवीन बीएस-6 वाहनांच्या स्पीडोमीटरनुसार धाव वेळ निश्चित करावी. आगारांमध्ये ग्रुप रोटेशन लावून सेवा ज्येष्ठतेनुसार कर्तव्ये सोपवावीत.
महिला सुरक्षा : महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना लवकर संपणारी शिफ्ट देण्यात यावीत.
पदोन्नतीचा प्रश्न : लिपिक पदोन्नती संदर्भातील जाचक अटींचे परिपत्रक रद्द करून, पदवीधर वाहकांना सरसकट पदोन्नती द्यावी.
विश्रांतीगृहांची दुरवस्था : हैदराबाद व वल्लभनगर (पुणे) येथील विश्रांतीगृहांमध्ये ढेकणांचा प्रादुर्भाव झाला असून, तिथे तातडीने पेस्ट कंट्रोल करण्यात यावे.