

ठाणे : समुद्रात सापडणार्या माशांचे वेगळे वैशिष्ट्य असते, तर खाडी किनारी सापडणारे मासे हे वेगळ्या धाटणीचे असतात. कमी प्रवाहात आपले जीवन फुलवणारे मासे छोट्या आकाराचे असतात. हे बहुतांश मासे खाडी किनार्याला सापडतात. मात्र, खाडी किनार्यांच्या वाढत्या प्रदूषणामुळे जवळजवळ 125 जातींपैकी 50 हून अधिक जाती या पडद्याआड गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
खाडी किनार्याला प्रामुख्याने वसई, विरार, कल्याण, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, भागातील खाडी किनार्यांवर ढोमी, मांदेली, बोंबिल,घोळ, छोटी पापलेट, कोलंबी, शिंगाली, चिंबोरी, खुबे, कालवे, निवट्या, कोळीम, भाईट, पाखट, वाकस, हेकरु, ताम, मुंशी, रावस, जिताडा, शेवंड, पाला, करपाल, टायनी, कापसी हे खार्या पाण्यातले ते गोड्या पाण्यामध्ये मळवे, हातूक, ढेकळा असे मासे प्रामुख्याने सापडतात. मात्र खाडी किनारे आणि नदी किनार्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रकल्पांचे पाणी जात असल्याने कल्याणची खाडी, ठाण्याची खाडी, पनवेलची खाडी, वसईची खाडी या खाड्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. त्याचबरोबर सावित्री, पाताळगंगा, अंबा, उल्हास अशा नद्यांमध्ये रासायनिक पाण्यामुळे प्रदूषण वाढल्याने मत्स्य जाती नष्ट होवू लागल्या आहेत.
खाडी किनारी सापडणार्या निवटी, खरबी, वाम या जाती नामशेष होत आल्या आहेत. गोड्या पाण्यातील मत्स्यजीवनही जवळजवळ नेस्तनाबूत होवू लागले आहे. एवढेच नव्हे तर समुद्री मासेही आता कमी होवू लागले आहे.
पापलेट आणि सुपर पापलेट हे प्रकार दुर्मिळ होत आहेत. गेल्या पाच वर्षात सातपाटी बंदरामध्ये पापलेटचे उत्पादन 20 टक्क्यांनी घटले आहे. गेल्या 5 वर्षात मत्स्य दुष्काळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरीतही नद्यांच्या पाण्यात प्रदूषण वाढू लागले आहे. त्यामुळे नद्या आणि खाड्यांमध्ये बोंबिल, घोळ, शेवंड, मांदेली, मुंशी या जाती दुर्मीळ झाल्या आहेत. दोन वर्षांत माशांचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. पुढील 10 वर्षांत मासे मिळणे अवघड होणार आहे. प्रामुख्याने यांत्रिकी मासेमारीमुळे मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत. नियमांचे पालन करून मच्छीमारी
होत नसल्याने हे संकट ओढवले आहे.