शहरातून चिऊताई भूर्र…. गावात दाणा-पाण्यामुळे चिवचिव

शहरातून चिऊताई भूर्र…. गावात दाणा-पाण्यामुळे चिवचिव
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : चिऊताई ये…. दाणा खा… पाणी पी. भूर्रर दिशी उडून जा…. हे बालगीत आता शहरी भागात हरवले आहे… शहरातील सिमेंट क्राँक्रीटच्या जंगलात कमी होत असलेली वृक्षसंपदा, फ्लॅट संस्कृतीतील बंद खिडक्या दारांमुळे चिऊताईंना घरट्यांना जागाच मिळत नसल्याने शहरातून चिऊताई भूर्रर झाली आहे… मात्र गावात अजूनही मोकळ्या जागा आणि चिऊताईच्या दाणा-पाण्यांची सोय होत असल्याने चिऊताईचे अस्तित्व अबाधित असल्याचे निरीक्षण पक्षी अभ्यासकांनी नोंदवले आहे.

तसेच मोबाईल टॉवरमुळे चिमण्यांच्या अस्तित्वाला कुठलाच धोका नाही, गेल्या १५-२० वर्षातील चिमण्यांची सांख्यिक स्थिती जैसे थे असल्याचे चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर दैनिक पुढारीशी संवाद साधतांना अभ्यासकांनी सांगितले. मात्र चिमणीचा अधिवास वाढविण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे फक्त होम स्पॅरो अर्थात गृह चिमणी आढळते. सिटीझन सायन्स रिपोर्ट नुसार मागील २५ वर्षात चिमण्यांची संख्या स्थिर आहे मात्र शहरातून कमी होत असल्याचे वास्तव महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.

शहरातून चिमणीचे वास्तव कमी होण्याची कारण सांगतांना ते म्हणाले, पूर्वी चिमण्या हमखास घराच्या बाहेर किंवा अगदी घरातही एखाद्या फोटो मागे किंवा खिडक्यांच्या वर घरटे करायच्या. आता मात्र शहरात घरांची दारे आणि खिडक्या तशा बंदच असतात. तसेच घराबाहेर धान्य वाळत घालणे, अन्न पदार्थ निवडणे, पाखडणे या क्रिया होत, त्यातले दाणे चिमण्या टिपत, पण आता शहरात बहुतांश या प्रक्रिया घरातच होतात, तिथं चिमण्यांना शिरकावाला जागा नसते, शहरातील अंगणेही हरवली आहेत, त्यामुळे चिमण्याला घराबाहेर मिळणारे दाणा-पाणी हरवले आहे. तसेच चिमण्यांचे खाद्य असलेले किटक, अळ्या, व धान्य शहरात आता उपलब्ध होत नाही तसेच घरटे करण्यासाठी जागा नाही, त्यांच्या अधिवासाच्या काही जागा कबुतरांनी बळकावल्यात त्यामुळे शहरांतून चिमण्या हद्दपार होत असल्याची खंत डॉ. वडतकर यांनी व्यक्त केली.

पाच वर्षांत ८ टक्क्के घट

चिमण्यांच्या अस्तित्वात सातत्याने होणारी घट विचारात घेता हा दिवस केवळ साजरा करुन भागणारे नाही तर वर्षभर चिमणी संवर्धनासाठीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांत ८ टक्के घट दिसून आली आहे. मात्र यंदा वाढलेले तापमान, जंगल वणवे, आणि वाढलेले सिमेंट काँक्रीटीकरण यामुळे चिमण्याची घट १० ते १५ टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता ज्येष्ठ पक्षी अभ्यासक तथा गेली पंचवीस वर्ष गिधाड व पक्षी संरक्षण आणि संवर्धन कार्याकरीता वाहून घेतलेल्या सिस्केप संस्थेचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.

जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद

जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या २६ पैकी केवळ २३ चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत. भारतात पाच प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यामध्ये, स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचादेखील समावेश आहे. याशिवाय, जगातही २४ प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यापैकी बहुतांश प्रजातींची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. १०१ पक्ष्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, ज्यामध्ये चिमणी या पक्षाचा समावेश आहे. चिमण्यांची संख्या शहरी भागातून मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ग्रामीण भागातही चिमण्यांचे प्रमाण कमी होत चालल्याचे या अहवालात नमुद करण्यात आलेल्याचे मेस्त्री यांनी सांगीतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news