

ठाणे : मतदार यादीतील घोळावर प्रचंड संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात थेट मनसे स्टाईलने दणका दिला आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातील संगणक फोडल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. मनसेचा आरोप आहे की मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका (घोळ) आहेत आणि अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वीच हे घडल्याने वातावरण तापले आहे.
सोमवारी मनसे कार्यकर्ते मतदार यादीमधील त्रुटी आणि घोळासंदर्भात तक्रार करण्यासाठी या कार्यालयात गेले होते. तेव्हा त्यांना धक्का बसला. संपूर्ण मतदारसंघाची मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी कार्यालयात केवळ एकच कर्मचारी उपलब्ध होता. अपुरे मनुष्यबळ आणि मतदार यादीतील त्रुटींसंदर्भात अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांचा संयम सुटला. त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट निवडणूक कार्यालयातील संगणकांवर हल्ला चढवला आणि ते फोडले.
या घटनेनंतर मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी निवडणूक आयोगाला कठोर इशारा दिला आहे. “निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरून काम करत असेल, तर आम्ही काय करायचं? सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा येणाऱ्या काळात मनसे स्टाईल दणका देऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मतदारसंघातील याद्या तातडीने अद्ययावत न केल्यास पुन्हा ‘मनसे स्टाईलने’ उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मनसे मुंब्रा अध्यक्ष राजू गायकवाड यांनी देखिल तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसताच मनसे कार्यकर्त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.