

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; राजकारणातील चर्चेत असलेले ठाकरे बंधू एकत्र होण्याची चर्चा सुरु आहे. या युतीवर एका माध्यमाच्या प्रतिनिधीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला होता. शिंदेंनी त्या प्रतिनिधींवर संताप व्यक्त करत कामाचे बोला असे सांगितले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे विश्वासू नेते माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी शिंदेंना पुन्हा एकदा डिवचले आहे. मतदारसंघातील मुख्यमंत्री असताना दिलेली आश्वासन अजूनही पूर्ण न झाल्याने पाटलांनी कामाचे प्रश्न विचारून शिंदेंना पुन्हा एकदा डिवचले आहे.
राज्यातील राजकरणात सध्या युतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे मनसेचे नेते विरोधकांना खास आपल्या शैलीत डिवचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मनसेने नेते माजी आमदार राजू पाटील यांनीदेखील उपमुख्यमंत्री शिंदेंना त्यांच्या भाषांच्या व्हिडिओ X वर पोस्ट करुन करुन त्यांनी दिलेल्या आश्वासनांची विचारणा केली आहे.
पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जे कामाचे नाहीत, ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत…! आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नासंदर्भात संबंधित पत्रकाराला चिडून बोलले की कामाचे बोला! चला तर मी पण काही कामाचे प्रश्न त्यांना विचारतोच. किमान नगरविकास मंत्री व आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे.
पलावा पुल कधी होईल? लोकग्राम पुल कधी होईल? दिवा रेल्वे ROB कधी होईल? बिल्डरांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या कल्याण-तळोजा मेट्रोचे भूसंपादन कधी होईल? आणि जर ते झाले नसेल तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी सुरू केलेले मेट्रो हे काम, त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे ते काम कधी स्थगित करणार? कल्याण-शीळ रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळेल व तिसरी लाईन कधी होईल? पलावा जंक्शनवरील अनधिकृत बांधकामांच्या जागामालकांना मोबदला देऊन ती बांधकामं तोडून पलावा चौक मोकळा करून दुसऱ्या पुलाचे काम कधी सुरू करणार? २७ गावांसाठी असलेली अमृत योजना कधी पुर्ण करणार? कल्याण-डोंबिवलीकरांच्या हक्काचा नवी मुंबईला दिलेला १४० एलएलडी पाणी कोटा आम्हाला कधी वर्ग करणार? अनधिकृत पणे सुरू केलेला दिवा डंपिंग कधी बंद करणार? नवी मुंबईत नव्याने घेतलेल्या १४ गावांच्या विकासासाठी आवश्यक ५९०० कोटी रूपयांचा पॅकेज कधी देणार? कल्याण-डोंबिवलीतल्या २७ गावांचा प्रश्न कधी मार्गी लावणार? मानपाडा रोड व कल्याण-शीळ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कधी हटविणार? याची उत्तर द्या असे पाटील यांनी एकनाथ शिंदेंना कामाच्या प्रश्नांची आठवण करून दिली आहे.