

ठाणे : पुढारी वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव काल पुन्हा एकदा मुंबईकरांना अनुभवायला मिळाला. रस्त्यावर अपघात झालेला पाहून आपला ताफा थांबवून ते अपघातग्रस्ताच्या मदतीला धावून गेले.
सोमवारी सातारा येथील आपल्या दरे गावातून मुंबईकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रवाना झाले होते. रात्री प्रवासात असताना विक्रोळीजवळ एका बाईकस्वाराचा अपघात झाल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपला ताफा थांबवून स्वतः गाडीतून उतरत या जखमी बाईकस्वाराची चौकशी केली. तसेच तत्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
चंद्रकांत पोळ (वय 42) असे या जखमी बाईकस्वाराचे नाव असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात त्याच्या पायाला मार बसला असून त्यावर उपचार करण्यात आले आहेत. आपल्याला अपघात झाला असताना देवदूत बनून मदतीसाठी स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे धावून आले पाहून त्याने त्यांचे मनोमन अभार मानले. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.