

डोंबिवली: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात डॉक्टरांसह परिचारिकांना झालेल्या मारहाण प्रकरणात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी संशयास्पद आणि मवाळ भूमिका घेतली, असा आरोप मनसेने केला आहे.
या प्रकरणी आयुक्तांचीही चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक तथा मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी केली आहे. या संदर्भात हर्षद पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, रूग्णालयात डॉक्टरांना मारहाण आणि परिचारिकांना शिवीगाळ झाल्याची माहिती मिळताच आयुक्तांनी त्याच रात्री रूग्णालयात जाणे अपेक्षित होते.
तसेच नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर रात्रीच गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधणे आवश्यक होते. मात्र आयुक्तांनी दुसऱ्या दिवसापर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. मारहाणीत जखमी झालेल्या डॉक्टरांना दुसऱ्या दिवशी आयुक्तांना भेटायला जायला लावण्यात आले.
त्यांना तीन तास दालनाबाहेर बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे पाठविण्यात आले. तेथेही त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे शहराध्यक्ष पाटील म्हणाले.
वरिष्ठ अधिकारीच पाठबळ देणार नसतील तर कर्मचारी काम कसे करतील? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनेमुळे केडीएमसीसह सर्वपक्षीय नगरसेवकांची सर्वत्र बदनामी झाली आहे. आयुक्तांनी पिडीत डॉक्टरांकडून तक्रार आल्यावरच पुढील प्रक्रिया करू, अशी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या कठोर भूमिकेबाबत शंका निर्माण होते, असेही शहराध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
आयुक्तांनी आरोप फेटाळले
दुसरीकडे आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, रूक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रूग्णालयात २४ तास बंदोबस्तासाठी पोलिस चौकी उभारण्याची आणि पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मारहाण प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असून, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण हमी दिली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.