

ठाणे : प्रवीण सोनावणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने केंद्राकडून महत्वाची पावले उचलण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातही बुलेट ट्रेनचे हाय स्पीड स्टेशन नियोजित असून या स्थानकामुळे दळणवळणाचे मोठे जाळे निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने एमएमआर रिजनमधील अस्तित्वातील आणि नियोजित असलेल्या वाहतूक व्यवस्थेचे एकत्रीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे हाय स्पीड स्टेशन हे समृद्धी महामार्ग तसेच विरार अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरशी जोडण्यात येणार आहे. याशिवाय ठाण्यासाठी मंजुरी मिळालेल्या अंतर्गत मेट्रोचा विस्तारही हाय स्पीड रेल्वे स्थानकापर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनामार्फत जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेच्या भागीदारीतून मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरचे काम हाती घेण्यात आले आहे. हाय स्पीड रेल्वे स्थानकांच्या परिसराचा विकास हा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विशेष नियोजन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ठाणे हाय स्पीड रेल्वे स्टेशन हे ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत म्हातार्डी या ठिकाणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ठाणे हाय स्पीड रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे 478 हेक्टर पैकी सुमारे 218 हेक्टर क्षेत्र ठाणे महापालिका क्षेत्रात असून 260 हेक्टर क्षेत्र हे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आहे. ठाणे हायस्पीड रेल्वे स्थानकामुळे ठाणे महापालिका क्षेत्राचा विकास होणारच आहे, मात्र यामुळे संपूर्ण एमएमआर रिजनमध्येच दळणवळणाचे जाळे निर्माण होणार आहे.
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली क्षेत्रात येत असलेल्या ठाणे हायस्पीड रेल्वे स्थानकाच्या परिसराच्या एकत्रित नियोजनाचे काम ठाणे महापालिकेवर सोपवण्यात आले आहे. ठाणे हाय स्पीड रेल्वे स्थानकामुळे वाहतूक व्यवस्थेला गती मिळणार असून ठाणे महापालिका तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येत असलेल्या अस्तित्वातील आणि नियोजित वाहतूक व्यवस्थेच्या साधनांचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आले. हा प्रस्ताव ठाणे तसेच मुंबई एमएमआर रिजनसाठी खर्या अर्थाने संजीवनी ठरणार आहे.
बुलेट ट्रेनचा आढावा घेण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री ठाण्यात...
बुलेट ट्रेनचे एक स्थानक दिवा भागातील म्हातार्डी येथे उभारले जाणार असून या मार्गिकेचा आढावा घेण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ठाण्यात येणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी ठाण्यात बैठक पार पडणार आहे. या जम्बो बैठकीत रेल्वे स्थानक परिसराचा विकास आराखडा तयार होणार आहे.
दरम्यान, ठाणेकरांच्या छताडावरून जाणार्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत स्थानिक आगरी, कोळी, शेतकर्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. 27 सप्टेंबर रोजी होणार्या जम्बो बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे अधिकारी, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी, ठाणे महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
असे होणार वाहतुकीचे नियोजन...
ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशनची जोडणी विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडोर तसेच समृद्धी महामार्ग, मुंबई - दिल्ली एक्सप्रेस वे सोबत जोडण्याचे नियोजन ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो मार्गिकेचा बुलेट रेल्वे स्टेशन पर्यंत विस्तार,
बुलेट रेल्वे स्टेशनजवळ नवीन जेट्टीचे बांधकाम मेरीटाईम बोर्ड द्वारे तपासण्यात येत आहे. त्यानुसार जलमार्गाचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल.
सागरमाला प्रकल्पाअंतर्गत ठाणे हाय स्पीड रेल्वे स्टेशन नजीक नवीन जेट्टीचे बांधकाम करण्याबाबतची सुसाध्यता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डद्वारे तपासण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन करीत जलमार्गाचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल.