Garbage crisis in Thane : महापालिकांच्या ठाणे जिल्ह्यात कचरा समस्या अधिक गंभीर

कचर्‍यापासून रस्तानिर्मिती आणि खतनिर्मिती प्रकल्पांवर विचार हवा कचर्‍याचे डोंगर कसे संपणार याचे नियोजन हवे
Garbage crisis in Thane
महापालिकांच्या ठाणे जिल्ह्यात कचरा समस्या अधिक गंभीरpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : ठाणे जिल्ह्यामध्ये सहा महापालिका येतात. या सर्वच महापालिकांमध्ये कचर्‍याची समस्या गंभीर आहे. खरं तर कचर्‍यापासून खत निर्मिती याबरोबरच कचर्‍यापासून रस्ते निर्मिती असा एक नवा दृष्टीकोन मानला जात आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी कचर्‍यापासून रस्ते बनविण्याचा पर्याय जाहीर करत याचे प्रात्यक्षिक दिल्लीत झाल्याचे सांगितले. कचरा निर्मूलनासाठी हा प्रयोगही तेवढाच महत्वाचा ठरणार आहे.

कचर्‍याच्या पुनर्वापरावर भर द्यायला हवा...

आपण जसजशी भौतिक प्रगती करतो, तसतसं आपलं वस्तू वापरण्याचं प्रमाण वाढतं आणि पर्यायाने आपण निर्माण केलेल्या कचर्‍याचे प्रमाण आणि प्रकारही अधिक वाढतात. पण, तो कचरा साठवून राहिल्याने त्याचा नागरिकांवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे कचरा हा योग्य पद्धतीने निकाली काढला गेला पाहिजे.

सर्व कचरा हानिकारक नसतो. कचर्‍याचे अनेक प्रकार असतात. त्यातील मुख्य दोन प्रकार म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय. असेंद्रिय कचरा अनेक पद्धतीने पुन्हा वापरण्यासाठी उपयोगात आणला जाऊ शकतो. सेंद्रिय कचरा, प्रत्येक माणसाला उपयोगात आणणे सहज शक्य आहे. पण, या सगळ्यासाठी इच्छाशक्ती असणं अत्यावशक आहे. कचर्‍याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. कचरा ही समस्या म्हणून न पाहता त्याकडे एक संधी म्हणून पाहायला हवे

विषारी कचर्‍याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

जागतिक बँकेच्या एका अंदाजानुसार 2025 मध्ये महाराष्ट्राच्या शहरी भागातून दररोज 57,600 टन एवढा कचरा निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात दर दिवशी 43.5 टन बायोमेडिकल कचरा तयार होतो. देशामध्ये तयार होणार्‍या एकूण बायोमेडिकल कचर्‍यापैकी 60% कचरा हा एकट्या महाराष्ट्रात तयार होतो. महाराष्ट्रात दरवर्षी एकूण 18 लाख टन विषारी कचरा तयार होतो. हा कचरा वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये तयार होतो, उदा. रासायनिक, पेट्रोकेमिकल, कागद तयार करणारे, चामड्याचे व इतर कारखाने. या विषारी कचर्‍याकडे देखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

नवी मुंबईतील तुर्भेची क्षमता संपली, मात्र स्वच्छतेला प्राधान्य...

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दर दिवशी 750 मॅट्रिक टन कचरा जमा होतो. एकूण कचर्‍यापैकी ओला 350 आणि सुका कचरा 400 किती असतो. तर महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडची क्षमताही 750 मॅट्रिक टन इतकी आहे. तुर्भे येथील जुन्या डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपलेली असल्याने महसूल विभागाकडून विकत घेतलेल्या नवीन जागेवर डम्पिंग सुरू झाले आहे का, त्याची सद्यस्थिती काय, याबाबत प्रशासनाकडून माहिती मिळालेली नाही. मी मात्र स्वच्छता सर्व्हेक्षणात पारितोषिक पटकावणार्‍या नवी मुंबई महापालिकेने शहर स्वच्छ करण्याबाबत मात्र गांभीर्याने पावले उचललेली असल्याचे पाहायला मिळते. नवी मुंबई हे नियोजित शहर असल्याने तसेच दरवर्षी स्वच्छता सर्व्हेक्षण स्पर्धेत येण्यासाठी प्रशासनाने चांगली मेहनत घेतल्याने इतर महापालिकांच्या तुलनेत नवी मुंबईमध्ये कचर्‍याची समस्या काही प्रमाणात कमी आहे.

कल्याण-डोंबिवलीमधील डम्पिंगची क्षमता संपली ...

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज 500 मेट्रिक टन कचर्‍याची निर्मिती होत असून हा कचरा ज्या डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो त्या आधारवाडीची क्षमता संपली आहे. त्यानंतर उंबर्डे येथील जागेचा नवा प्रस्ताव महापालिकेने पुढे आणला असला तरी या जागेला देखील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. परिणामी कचरा टाकायचा कुठे असा मोठा प्रश्न महापालिकेसमोर उभा राहिला आहे. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात दहा छोटे छोटे प्रकल्प करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र यातील आताच्या घडीला केवळ चारच प्रकल्प कार्यान्वयीत आहेत. याव्यतिरिक्त काही प्रकल्पाची आखणी देखील स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असली तरी हे प्रकल्प देखील कागदावरच असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही कचर्‍याची समस्या अद्याप जैसे थे आहे असेच म्हणावे लागेल.

भिवंडीत तर कचरा वर्गीकरणाचीही बोंब...

एमएमआर रिजनमधील सर्वात लहान महापालिका म्हणून भिवंडी महापालिका असली तरी या ठिकाणी कचर्‍याच्या नियोजनाचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे ओला कचरा आणि सुखा कचरा असे वर्गीकरण करणे आवश्यक असताना भिवंडीत मात्र हे वर्गीकरण करण्याचीही साधी तसदी घेतली जात नाही. त्यामुळे कचर्‍यावर प्रक्रिया देखील केली जाते का नाही देखील मोठा प्रश्न आहे.

भिवंडी महापालिकेला हक्काचे डम्पिंग ग्राउंड सुद्धा उपलब्ध नसून अर्धा कचरा हा चेना गाव तर अर्धा कचरा हा नया गाव या ठिकाणी टाकला जातो. शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍याबाबत पालिका प्रशासन गंभीर नसल्याने शहरातही काही ठिकाणी कचर्‍याचे ढीग पाहायला मिळतात.

मिरा-भाईंदरमध्ये कचर्‍याचे पाणी झोपडपट्ट्यांमध्ये...

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात दररोज 550 मॅट्रिक टन कचर्‍याची निर्मिती होत असून हा सर्व कचरा हा उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र या उत्तनच्या डम्पिंगला देखील नागरिकांचा कडाडून विरोध आहे. त्याला कारणही तसेच योग्य आहे. उत्तनला समुद्र किनारा लाभला असल्याने पावसाळ्यात तर अक्षरशः हे डम्पिंगचा कचरा पाण्यासोबत वाहत येत असून हा कचरा झोपडपट्टी भागात जातो.

परिणामी दुर्गंधीयुक्त घाण पाणी नागरिकांच्या अक्षरशः घरात शिरते. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरातील कचरा ही केवळ महापालिकेची समस्या नसून याचा सर्वाधिक त्रास हा या शहरातील आणि विशेष करून झोपडपट्टी भागातील नागरिकांना आहे. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात 10 ते 20 टनाचे प्रकल्प राबवण्यात येत असून हीच काय ती महापालिकेची जमेची बाजू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news