

डोंबिवली : आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमाद्वारे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी तक्रारींचा निपटारा करताना ऑन द स्पॉट पंचनामा करून शेकडो ग्रामस्थांसह रहिवाशांना दिलासा दिला आहे. ज्या विभागाशी संबंधित तक्रार असेल त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन आमदार मोरे यांनी हजरजबाबीपणा दाखवून दिला.
डोंबिवली शहर शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने आयोजित 'आमदार आपल्या भेटीला'! या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांसह रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवारी (दि.23) सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत मध्यवर्ती शाखेत पार पडला. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांना भेटण्यासाठी 100 हून अधिक नागरिकांनी खासगी, तसेच सार्वजनिक अर्थात सामाजिक समस्या मांडल्या.
यावेळी डोंबिवली शहर, नेतीवली विभाग, एमआयडीसी विभाग, दिवा शहर, 14 गावे, 27 गावे, शिळफाटा विभाग, आदी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या नागरिकांनी सार्वजनिक समस्यांमध्ये बस सेवा, रखडलेली शासकीय कामे, अर्थ साह्य, वैद्यकीय सेवा, पाणी समस्या आणि शैक्षणिक समस्येसह नोकरी संदर्भात प्रश्न मांडले. तर खासगी समस्यांमध्ये आर्थिक फसवणूक, शिफारसपत्र, शासकीय योजनांचा लाभ मिळविणे, यांसारख्या प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी ग्रामस्थांसह रहिवाशांच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देताना आमदार राजेश मोरे यांनी शासनाच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून अनेक समस्यांचे निराकरण केले. पोलिस, तहसीलदार कार्यालय, महानगरपालिका, रेशनिंग कार्यालय, शैक्षणिक विभाग यांसह विविध शासकीय यंत्रणांशी संवाद साधून तक्रारदारांच्या कामांना गती दिली.
कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनीही गर्दी केली. पहिल्याच कार्यक्रमात अनेक प्रश्न मार्गी लागल्याने तक्रारदारांमध्ये समाधान दिसून आले. आमदारांनी दाखवलेल्या तत्परतेने व संवेदनशीलतेने उपस्थित नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
'आमदार आपल्या भेटीला'! या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांसह रहिवाशांच्या अपेक्षांना नवी दिशा मिळाली आहे. कार्यक्षेत्रात काम करताना तक्रारदारांच्या व्यथा आणि समस्यांचा निपटारा करण्यासाठी सहकाऱ्यांचे देखील सकारात्मक योगदान असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.