

मिरा रोड : गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी एका महिला रिअल इस्टेट एजंटकडे २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या काशीमीरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडून अटक केली. शरद खाडे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार या रिअल इस्टेट एजंट असून, रिअल इस्टेट एजंट वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्य आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका महिलेला भाडेतत्त्वावर फ्लॅट दिला होता. या व्यवहारासाठी रीतसर भाडेकरार करण्यात आला होता, तसेच संबंधित भाडेकरू महिलेबाबत पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्रही (एनओसी) घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच काशीमीरा पोलिसांनी या महिलेला अटक केली.
पोलीस तपासात ती महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले होते. बांगलादेशी महिलेला फ्लॅट भाड्याने दिल्याप्रकरणी तक्रारदार महिला यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती पोलीस उपनिरीक्षक शरद खाडे यांनी दाखवली. गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी खाडे यांनी त्यांच्याकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.