Panvel Air Pollution : पहाटेच्या धुक्याआड प्रदूषणाचे साम्राज्य; मॉर्निंग वॉकही धोकादायक

खारघरच्या टेकडीवरून समोरच्या उंच इमारतीही दिसेनात; पनवेलकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Panvel Air Pollution
Panvel Air Pollutionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंब्रा : निरोगी आरोग्यासाठी पहाटे उठून मोकळ्या हवेत फिरायला जाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या पहाटेच्या वेळी वाढणारे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंतेचा विषय बनले आहे. शहरातील गार्डन, टेकड्या आणि मोकळ्या जागांवर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना स्वच्छ हवेऐवजी प्रदूषित वातावरणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य चांगले राखण्यासाठी घराबाहेर पडणारा मॉर्निंग वॉकच धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

खारघर, ठाणे येथील टेकडीवर पहाटेच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनाही प्रदूषणाची तीव्रता जाणवत आहे. परिसरात धुरकट वातावरण पसरलेले असते. इतकेच नव्हे, तर टेकडीवरून समोर असलेल्या उंच इमारतीही स्पष्टपणे दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे हे केवळ धुके आहे की हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Panvel Air Pollution
Thane Development : शाळा, आरोग्य केंद्र आधुनिकीकरणासाठी साडेपाचशे कोटींचा आराखडा

पहाटेच्या वेळी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने चालण्यासाठी घराबाहेर पडतात. अनेक नागरिक आरोग्य चांगले राहावे, श्वसनाचे विकार टाळावेत आणि दिवसभर उत्साही राहावे, या उद्देशाने नियमित मॉर्निंग वॉक करतात. मात्र, हवेत प्रदूषित कणांचे प्रमाण वाढले असल्यास अशा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पनवेल, खारघर, कळंबोली आणि कामोठे, ठाणे परिसरात वाढते शहरीकरण, बांधकामे, वाहनांची वर्दळ आणि धुळीमुळे हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होत आहे. पहाटेच्या वेळी प्रदूषणाची नेमकी पातळी किती असते, याची अधिकृत आकडेवारी नागरिकांसमोर येणे आवश्यक आहे.

Panvel Air Pollution
Maharashtra Medical Admission : एमबीबीएस, बीडीएसचे ९९.५६ टक्के प्रवेश

प्रदूषणाची कारणे शोधावीत...

एकीकडे पनवेल महानगरपालिका स्वच्छ आणि सुंदर शहराचा संकल्प करीत असताना दुसरीकडे नागरिकांना स्वच्छ हवा मिळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. महानगरपालिका प्रशासनाने पहाटेच्या वेळेतील हवेच्या गुणवत्तेची तपासणी करून प्रदूषणाची कारणे शोधावीत आणि त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्वच्छ हवेसाठी नागरिकांची प्रतीक्षा

शहरातील प्रदूषणाचा प्रश्न केवळ दिवसा रस्त्यांवर दिसणाऱ्या धुळीपुरता मर्यादित राहिलेला नाही. पहाटेच्या वेळीही प्रदूषित वातावरणाचा सामना करावा लागत असेल, तर नागरिकांनी आरोग्य जपण्यासाठी जायचे कुठे? पनवेल महानगरपालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन नागरिकांना स्वच्छ हवा देण्यासाठी ठोस पावले कधी उचलणार, असा प्रश्न आता पनवेलकर विचारत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.