मिरा रोड : फेसबुकवर झालेली ओळख... त्यानंतर व्हॉट्सॲपवर सुरू झालेला संवाद... महागडे पार्सल पाठविल्याचे सांगत त्याच्या सुटकेसाठी वेगवेगळ्या शुल्कांची मागणी... आणि त्यातच मीरारोडमध्ये नवीन घर घेऊन सोबत राहण्याचे दाखवलेले गाजर! या सगळ्यावर विश्वास ठेवणे मीरारोडमधील एका ७५ वर्षीय सेवानिवृत्त महिलेला तब्बल १ कोटी ६६ लाख १० हजार रुपयांना महागात पडले. पैसे पाठवत राहिलेल्या महिलेच्या हाती अखेर ना महागडे पार्सल आले, ना घराचे स्वप्न दाखविणारा ‘फेसबुक मित्र’! फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने काशिमीरा पोलिसांकडे धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोड येथे राहणाऱ्या एका ७५ वर्षीय महिलेशी आरोपीने फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला. फेसबुक अकाऊंटवरून तसेच एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश पाठवत आरोपीने हळूहळू त्यांच्याशी मैत्री वाढवली.
विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने शिपिंग कार्गोद्वारे एक महागडे पार्सल पाठविल्याचे सांगितले. मात्र, हे पार्सल मिळवण्यासाठी कार्गो कर्मचाऱ्यांचे शुल्क, विविध प्रक्रिया शुल्क आदी कारणे सांगत आरोपीने पैशांची मागणी सुरू केली.‘पार्सल’च्या नावाने सुरू झालेला पैशांचा सिलसिला थांबण्याऐवजी वाढतच गेला.
त्यातच आरोपीने मीरारोडमध्ये नवीन घर घेऊन फिर्यादीसोबत राहण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने ३ एप्रिल ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत आपल्या तीन बँक खात्यांमधून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल १ कोटी ६६ लाख १० हजार रुपये वर्ग केले. मात्र, एवढी मोठी रक्कम पाठवल्यानंतरही महागडे पार्सल काही आले नाही. त्याचवेळी आरोपीशी संपर्कही तुटला. आपण मोठ्या सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे लक्षात येताच महिलेने काशिमीरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी फेसबुक अकाऊंट धारक, मोबाईल क्रमांक धारक तसेच संबंधित बँक खातेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कदम करीत आहेत.