

मिरा रोड : कर्नाटक येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाला कंपनीमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून मिरा रोड येथे बोलावून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी त्याला बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून व्यावसायिकाला तीन दिवस डांबून ठेवत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2 कोटी 17 लाख 63 हजार 287 रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील व्यावसायिक शमंतकुमार शडक शरप्पा करडेर (31) यांना 15 डिसेंबर 2025 रोजी अंकित नावाच्या व्यक्तीने फोन केला. अंकितने त्यांच्या कंपनीत मोठी गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांना चर्चेसाठी काशिमीरा, मिरा रोड येथे बोलावले.
व्यावसायिक शमंतकुमार काशिमीरा येथे पोहोचले असता, अंकित आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना अगोदर ए. आर. पॅराडाईज हॉटेल मध्ये व त्यानंतर आर. के. प्रिमीयम हॉटेलमध्ये नेले. 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत त्यांना त्या बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर आरोपींनी शमंतकुमार यांच्याकडे त्यांच्या नेट बँकिंगचा आयडी आणि पासवर्ड मागितला. त्यांनी नकार दिला असता, अंकितने पिस्तूल काढले तर त्याच्या साथीदाराने चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. दहशतीखाली असलेल्या फिर्यादींकडून आरोपींनी जबरदस्तीने बँकेच्या करंट अकाउंटचे तपशील मिळवले. त्यानंतर त्यांच्या संमतीशिवाय एकूण 2,17,63,287 रुपये इतर खात्यांवर वळवले.
या घटनेनंतर फिर्यादीने 30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची प्राथमिक चौकशी करून आरोपी अंकित व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडे हे करत आहेत. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आर्थिक गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.