

मिरा रोड : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. परिमंडळ-1 अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांनी गुन्ह्यांच्या तपासात हस्तगत केलेला तब्बल 4 कोटी 82 लाख 64 हजार 979 रुपयांचा मुद्देमाल एका विशेष कार्यक्रमात तक्रारदारांना सन्मानाने परत करण्यात आला. मिरारोड येथील शहनाई हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता हा कार्यक्रम पार पडला.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या हस्ते फिर्यादींना त्यांचे चोरीला गेलेले दागिने, वाहने आणि रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली. आपली कष्टाची कमाई आणि हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याने अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ-1 मधील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा छडा लावून हा माल जप्त करण्यात आला होता.